राष्ट्रवाद की भीती? नरवणे यांच्या पुस्तकामुळे लोकशाही का हादरली?


‘नो नो’ म्हणत अध्यक्ष मौनात गेले, प्रश्न मात्र देशासमोर उभे राहिले ; लोकसभेत गोंधळ, सीमारेषेवर मौन   

ज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी मंत्री, सत्ताधारी खासदार आणि विरोधी पक्षाचे खासदार आपापली मते मांडत होते. मात्र ज्या क्षणी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचा क्रमांक आला, त्याच क्षणापासून लोकशाहीची गळचेपी सुरू झाली.

राहुल गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवात थेट भारतीय स्थलसेनेचे माजी प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या “Four Stars of Destiny” या आत्मचरित्रातील संदर्भाने केली आणि अवघ्या काही सेकंदांत सभागृहात प्रचंड गोंधळ घालण्यात आला. तब्बल ४५ मिनिटे नियोजित पद्धतीने राहुल गांधींना बोलूच दिले गेले नाही.

राहुल गांधी स्पष्टपणे म्हणत होते की, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आमच्या देशभक्तीवर, आमच्या चारित्र्यावर आरोप केले आहेत. त्याचे उत्तर देणे हा माझा लोकशाही अधिकार आहे. पण तरीही अध्यक्षांनी नियमांचा बडगा उगारत, अखेरपर्यंत त्यांना आपली बाजू मांडूच दिली नाही.

विरोधी पक्षाचे खासदार प्रश्न विचारत होते नियम, परंपरा आणि मर्यादा फक्त विरोधकांसाठीच आहेत का? सत्ताधाऱ्यांसाठी काहीच नियम नाहीत का? यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नेहमीप्रमाणे “नो… नो… नो…” म्हणत वेळ मारून नेली. ठोस उत्तर देण्याची हिंमतही त्यांनी दाखवली नाही. आजच्या संपूर्ण चर्चेमुळे एकच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला खरा राष्ट्रवादी कोण आणि केवळ घोषणाबाज सनातनी कोण?

सत्ताधारी पक्षाचे खासदार किंवा मंत्री बोलत असतील, तेव्हा अध्यक्ष ओम बिर्ला मंत्रमुग्ध होऊन ऐकतात. जणू काही ते भगवद्गीतेचे प्रवचन ऐकत आहेत! त्यांच्या एकाही शब्दावर आक्षेप नाही, नियमांची आठवण नाही, परंपरेचा उल्लेख नाही.
पण विरोधी पक्षाने उत्तर देण्याची तयारी केली, की अचानक नियम, नियमावली, मर्यादा आणि परंपरा जाग्या होतात. 
अखेर संतापून राहुल गांधींनी अध्यक्षांना थेट विचारले,मी या सभागृहात काय बोलावे, ते तुम्हीच सांगून टाका. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खासदाराला असा प्रश्न विचारावा लागतो, ही लोकशाहीची शोकांतिका नाही तर काय? राहुल गांधींनी तडजोडीचा मार्ग स्वीकारत ‘पंतप्रधान’ आणि संरक्षण मंत्री  एवढे शब्द उच्चारले, तरीही अध्यक्षांनी पुन्हा  नो नो  करत त्यांचे बोलणे बंद पाडले.

महत्त्वाची बाब म्हणजे, जनरल मनोज नरवणे यांचे “Four Stars of Destiny” हे पुस्तक भारतात अधिकृतपणे प्रसिद्ध होऊ दिले गेले नाही. मात्र ते आजही ॲमेझॉनवर उपलब्ध आहे, विकले जात आहे, वाचले जात आहे. हे पुस्तक मे २०२४ मध्ये प्रकाशित झाले असून त्यावर देश-विदेशात चर्चा सुरू आहे.

या आत्मचरित्रात ३१ ऑगस्ट २०२० रोजी लडाखमधील कैलास टेकडी परिसरात घडलेल्या गंभीर घटनांचा तपशील आहे. लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांनी चीनच्या हालचालींबाबत तातडीची माहिती जनरल नरवणे यांना दिली होती. परिस्थिती अतिशय गंभीर होती. प्रत्येक मीटर उंची रणनीतीदृष्ट्या महत्त्वाची होती.

जनरल नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण स्पष्ट, पारदर्शक आणि ठोस आदेश मिळालाच नाही.

यालाच राष्ट्रवाद म्हणायचे का? यालाच देशभक्तीची जयजयकार म्हणायची का?न्यूज लाँचरचे आशिष चित्रांशी यांनी योग्यच म्हटले आहे की, हाच घटनाक्रम जनतेसमोर येऊ नये म्हणून राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिले गेले नाही. राहुल गांधी फक्त इतकेच सांगू पाहत होते की, आमच्यावर देशद्रोहाचे आरोप केले गेले. आमच्या देशप्रेमावर संशय टाकण्यात आला. त्याचे उत्तर मी भारतीय लष्करप्रमुखांच्या शब्दांत देणार आहे. आणि इथूनच सत्ताधाऱ्यांची भीती उघडी पडली.

समाजवादी पार्टीचे खासदार अखिलेश यादव यांनीही अध्यक्षांना विनंती केली की चीनसारखा संवेदनशील विषय देशहितासाठी चर्चिला जावा. त्यांनी जॉर्ज फर्नांडिस आणि मुलायमसिंह यादव यांचे संदर्भ दिले. तरीही अध्यक्षांनी कानाडोळा केला. आज लोकसभेत जे घडले, ते देशाच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिले जाईल.लोकशाहीला गप्प करण्याचा, प्रश्नांना दाबण्याचा आणि सत्य लपवण्याचा हा उघड प्रयत्न होता. राष्ट्रवाद म्हणजे घोषणा नाही. देशभक्ती म्हणजे प्रश्न विचारण्याची हिंमत आणि ही गोष्ट आज संपूर्ण देशाने पाहिली आहे.जनतेला हे कळत नाही, असे समजण्याची चूक सत्ताधाऱ्यांनी करू नये.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *