![]()
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील अंत्यसंस्कारावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत 12 ते 15 जणांचे सुमारे 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. 28 जानेवारी रोजी झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, विशेषतः मोठ्या पोलिस बंदोबस्तातही हा प्रकार घडला. अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर पक्षांचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. याच गर्दीचा गैरफायदा घेत सोनसाखळी चोरट्यांनी आपला डाव साधला. काही चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मोहम्मद सादिक मोहम्मद सिराज, मोहम्मद अनिस मोहम्मद युनुस, येजाज भग्गू मिरावले (सर्व रा. दिग्रस, यवतमाळ), राजकुमार बाबुराव आठवले (रा. गेवराई, बीड), बाळ बबन बोथे (रा. पळसदेव, ता. इंदापूर, पुणे) आणि त्याचे दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत बाबासाहेब जाधव आणि रमेश लालासाहेब वाबळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. एका नामांकित वृत्तवाहिनीचे पत्रकार रणजीत जाधव हे 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनाची बातमी कव्हर करण्यासाठी विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची साखळी चोरली. त्यांनी तात्काळ एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, परंतु साखळी मिळू शकली नाही. याच पद्धतीने गर्दीचा फायदा घेऊन अंकुश दिघे, प्रशांत सपकाळ, विजय शिंदे, जालिंदर बसले, संजय काटे, निलेश काटे, अशोक मोरे, मनोहर जाधव, सतीश सातकर, विकास भागवत आणि विजया पवार यांचेही दागिने चोरट्यांनी पळवले आहेत. बारामती पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याबाबत आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून इतर आरोपींचे साथीदार निष्पन्न केले जात असल्याची माहिती बारामती पोलिसांनी दिली आहे.
अजित पवारांच्या अंत्यसंस्कारात गर्दीतून 25 लाखांचे दागिने चोरी:12 ते 15 जणांना लक्ष्य करत चोरट्यांनी साधला डाव; काही आरोपींना अटक
