खेडमध्ये वारस नोंदीसाठी महिला तलाठी, कोतवाल लाच घेताना जेरबंद:5,500 रुपयांची लाच घेताना एसीबीची कारवाई

0
a351b1ad-c15d-4584-ab7c-9b213f390a16_1778305996208.jpg




पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वारसनोंदीसाठी 5,500 रुपयांची लाच घेताना एका महिला तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव खंडोबा येथील तलाठी मनीषा साहेबराव माने (वय 45) आणि कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या वडिलांचे 2024 मध्ये निधन झाले होते. त्यांची खरपुडी बुद्रुक येथील वडिलोपार्जित शेतजमीन तक्रारदाराच्या आणि इतर नातेवाईकांच्या नावावर आहे. या जमिनीवर वारसनोंद करण्यासाठी तक्रारदाराने निमगाव खंडोबा महसूल कार्यालयात अर्ज केला होता. वारंवार पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने तलाठी माने यांनी कोतवाल चव्हाण यांच्यामार्फत 6 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने पुणे एसीबी कार्यालयात संपर्क साधला. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. तडजोडीअंती 5,500 रुपये (500 रुपये स्टॅम्पचे आणि 5,000 रुपये वारसनोंदीचे) देण्याचे ठरले. त्यानुसार, गुरुवारी दुपारी 3:40 वाजण्याच्या सुमारास निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी खेड-राजगुरूनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे, अविनाश घरबुडे व त्यांच्या पथकाने केली. शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed