कथाकारांनी मराठी साहित्य समृद्ध केले- ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले:शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'कथाकार सन्मान' प्रदान
![]()
ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या तीन कथाकारांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केल्याचे मत व्यक्त केले. या तिन्ही कथाकारांची कथाकथन करण्याची स्वतःची बलस्थाने होती आणि त्यांनी सभोवतालची माणसे व त्यांचे जगणे प्रामाणिकपणे मांडले, असे गोडबोले म्हणाल्या. मराठी साहित्यविश्वातील या तीन दिग्गज कथाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘विदिशा विचार मंच’ आणि ‘कोहिनूर कट्टा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मरण तीन कथाकारांचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना ‘कथाकार सन्मान’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होत्या. मंगला गोडबोले यांनी सांगितले की, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या अनेक कथा वाचूनच त्या कथालेखनाकडे वळल्या. हे तिघे समकालीन लेखक असले तरी त्यांची दृष्टी आणि लेखनशैली वेगळी होती. अशा ज्येष्ठ कथाकारांच्या जन्मशताब्दीनिमित्त सन्मानित होणे हा आपल्यासाठी मोठा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले. कथा लिहिणे हा एक सहज उद्गार वाटला तरी, अनेकदा कथा कागदावर उतरवताना अनपेक्षित वळणे घेण्याचा धोका जाणवला. तरीही त्यातील आव्हान आणि आनंदामुळे त्या पुन्हा पुन्हा लेखनाकडे आकर्षित होत राहिल्या, असे गोडबोले यांनी सांगितले. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशातील बदलते ग्रामजीवन या तीन लेखकांनी प्रभावीपणे रंगवले, तर आपण मुख्यत्वे स्त्री जाणिवांचा वेध घेतला. व्यक्तिगत जीवन आणि अनुभवांमुळे आपल्या अनेक कथा स्त्री-केंद्री झाल्या असल्या तरी, त्या स्त्रीवादी ठरल्या नाहीत. स्त्री जीवनाचा जो प्रत्यय आला आणि जे नोंदवावेसे वाटले, त्यावर आपण लेखन केले, असे त्यांनी स्पष्ट केले.
