![]()
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामानामुळे रब्बी पिके विविध रोगांच्या विळख्यात सापडली आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची आणि उत्पन्न घटण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकरी चिंतेत आहेत. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाण्याची उपलब्धता असल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिके जोमात होती. अनुकूल वातावरण आणि मुबलक पाण्यामुळे पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. वाढलेले धुके आणि ढगाळ हवामानामुळे पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. मान्सूनमधील अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता. त्याची भरपाई रब्बी हंगामात होईल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची पेरणी केली होती. यावर्षी हरभरा, गहू आणि गावरान कांद्याच्या लागवडीत वाढ झाली होती. परंतु, आता वातावरणातील बदलामुळे गावरान कांदा, गहू, हरभरा, लसूण आणि चारा पिके मोठ्या अडचणीत आली आहेत. विविध पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गहू पिकावर मावा आणि तांबेरा, ज्वारीवर चिकटा व मावा, तर हरभऱ्यावर घाटे अळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. कांदा आणि लसूण पिकांवर मावा, तुडतुडे, मर, करपा आणि डाऊनी यांसारखे रोग आढळत आहेत. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा धोका आहे, तर भाजीपाल्यातील टोमॅटोवर अळी व डाऊनी, भेंडीवर नागअळी, लाल कोळी आणि अळीचा प्रादुर्भाव होत आहे. कोथिंबीरवर भुरी, वांगी पिकावर अळी, मेथीवर मावा आणि कोबीवरही अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
ढगाळ हवामानाने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव:कांदा, गहू, लसूण, चारा पिके धोक्यात; उत्पन्न घटण्याची भीती
