हिंगोली अवकाळी पावसामुळे हळद भिजली:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज ‘कृउबा’चा लिलाव बंद पाडला; गोंधळाची स्थिती
![]()
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे हळद भिजल्याने संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तारीख 6 हळदीचा लिलाव बंद पाडला या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हिंगोली जिल्हा हा “पिवळ्या सोन्याचा” अर्थात हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना आता हळद उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठी हळद खरेदी करणारी बाजारपेठ म्हणून हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मात्र, हळदीच्या वाढलेल्या आवक संदर्भात कुठलेही प्रकारचे नियोजन बाजार समितीकडून केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान मंगळवारी ता ५ अचानक झालेल्या पावसामुळे बाजार समिती परिसरातील शेतकऱ्यांची हळद पूर्णतः भिजून मोठे नुकसान झाले. यामुळे आज संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जोरदार आंदोलन छेडले. “शेतकऱ्यांची हळद काळी झाली” या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या मुख्य गेटला काळे लावले. त्यानंतर संतप्त शेतकरी मोठ्या संख्येने मार्केट कमिटीमध्ये दाखल झाले. यावेळी हळदीचे दर घसरल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला.शेतकऱ्यांच्या हळदीला योग्य दर मिळत नसल्याने आणि खरेदी प्रक्रियेमध्ये होत असलेल्या विलंबामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही काळासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव बंद पाडला. यानंतर पोलिस आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. बाजार समिती प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांची हळद योग्य दराने खरेदी करण्यात येईल,खरेदीसाठी जास्त वेळ लागणार नाही तसेच भविष्यात कोणत्याही शेतकऱ्यांची हळद भिजणार नाही याचे नियोजन करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, सखाराम भाकरे, विठ्ठल वायचाळ, राम चव्हाण, संतोष सावके, संदीप पाटील, मनोहर पाटील,अशोकराव जयस्वाल,विशाल पोळ आदी पदाधिकारी व शेकडो शेतकरी उपस्थित होते.
