पुण्याच्या महापौरांचे पोलिस आयुक्तांना पत्र:सीसीटीव्ही दुरुस्ती, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पडताळणीची मागणी
![]()
पुणे शहरात अलीकडेच नसरापूर व पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कार्यक्षम असणे अत्यावश्यक आहे. सध्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळून येत असून, त्यांची तात्काळ दुरुस्ती व पुनर्स्थापना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच, शहरातील सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची योग्य ती पोलीस पडताळणी व पार्श्वभूमी तपासणी सक्तीने करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती योग्य पडताळणीशिवाय सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत राहू नये, यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर, नागरिकांनीही आपल्या परिसरात सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापौरांनी नमूद केले आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींची माहिती, नवीन भाडेकरूंची नोंद, संशयास्पद हालचाली याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क ठेवण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
महापौरांच्या प्रमुख मागण्या पुणेकर नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, या विषयाकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रभावी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली आहे.
