नाशिकमध्ये शेतकऱ्यांना मारहाण:जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, ही मस्ती महागात पडणार; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा
![]()
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या बाह्य परिक्रमा मार्गासाठी (रिंग रोड) सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरात जमीन मोजणीदरम्यान अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना, तसेच महिलांना घरात घुसून मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर शेलक्या शब्दांत प्रहार केला आहे. “सत्तेच्या माजात सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, ही मस्ती महागात पडेल,” असा सज्जड दम दानवे यांनी दिला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६६ किलोमीटरचा रिंग रोड विकसित केला जात आहे. यासाठी दरी, मातोरी, मुंगसरे, मखमलाबाद यांसह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असतानाही, शुक्रवारी रात्री अचानक व्हॉट्सॲपवर मोजणीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या. शनिवारी सकाळी साडेनऊची वेळ असताना, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी जी. व्ही. एस. पवनदत्ता, तहसीलदार आणि पोलिसांचा मोठा ताफा सकाळी सात वाजताच मुंगसरे गावात धडकला. यावेळी मोजणीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना आणि महिलांना पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नेमके काय म्हणाले अंबादास दानवे? अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून मारहाण झालेल्या पीडितांच्या प्रतिक्रिया जोडल्या आहेत. अंबादास दानवे म्हणाले, प्रभू रामाच्या या पावन भूमीत माता-भगिनींवर हात टाकून सरकारने आपल्या विनाशाची नांदी लिहू नये! कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकरी आणि महिलांना घरात घुसून मारहाण करण्याची मस्ती आता महागात पडणार. प्रशासकीय बळाचा वापर करून बळीराजाचा आवाज दाबता येईल, या भ्रमात सरकारने राहू नये, असा इशारा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला आहे. धोक्याचा इशारा स्पष्ट आहे. सत्तेच्या माजात सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, संघर्षाची ठिणगी टाकायच्या भानगडीत सरकारने पडू नये. तो आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त चांगला करता येतो, असेही अंबादास दानवे म्हणाले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना प्रशासनाने घाईघाईने आणि पहाटेच्या सुमारास मोजणी करण्याचा घाट का घातला? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मातोरी आणि मुंगसरे येथील पीडित महिलांनी रडत आपली आपबिती सांगितली असून, प्रशासनाकडून झालेल्या या दडपशाहीमुळे परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले आहे. या मारहाणीनंतर रिंग रोडच्या भूसंपादनाला होणारा विरोध आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मारहाण प्रकरणाची चौकशी होणार दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर बोलताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे नाशिक रिंगरोडच्या मोजणीवेळी काही अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल,”
