![]()
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या आंदोलनांना प्रतिसाद मिळत नसल्याने इतरांच्या आंदोलनांना पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मतदारसंघ पुनर्रचना, मतदार यादी विशेष पुनरावलोकन (SIR), पर्यावरण, शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘ठाकरेंकडे कार्यकर्तेच उरले नाहीत’ उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, “ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही गटांना आंदोलनासाठी माणसं मिळत नाहीत. त्यामुळे जिथे कुठे आंदोलन होईल तिथे सहभागी होणं एवढंच त्यांचं काम उरलं आहे. स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व आणि कार्यकर्ते कमी झाल्यामुळे त्यांना इतरांच्या आंदोलनात जावं लागत आहे.” सुप्रिया सुळे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना नमस्कार करत त्यांच्या पाया पडल्याच्या चर्चेवर महाजन म्हणाले, “त्यात चुकीचं काहीच नाही. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ज्येष्ठांचा सन्मान करण्याची आहे. मी स्वतःही ज्येष्ठ व्यक्तींना वाकून नमस्कार करतो. त्यामुळे या गोष्टीचं राजकारण करण्याचं कारण नाही.” रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया मतदारसंघ पुनर्रचना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित मतभेदांवर बोलताना त्यांनी सांगितले की, रोहित पवार सुरुवातीपासून अनेक मुद्द्यांवर वेगळी भूमिका घेत आहेत. “हा त्यांच्या पक्षातील आणि कुटुंबातील विषय आहे. त्यांनी तो आपसात सोडवावा. महायुतीत येण्याचा प्रश्न निर्माण झाला तर पुढचा निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल,” असे ते म्हणाले. संजय राऊतांना उत्तर देण्यास नकार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर महाजन म्हणाले, “त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपेपर्यंत ते रोज काही ना काही बोलत राहतील. रोज त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर देऊन आम्ही आमचं तोंड खराब करून घेणार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं.” व्हायरल फोटोप्रकरणी आरोपी अटकेत स्वतःचे फोटो एडिट करून व्हायरल केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीने पोस्ट तयार करून व्हायरल केल्याची कबुली दिली असून त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून सध्या कोणावरही राजकीय आरोप करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. SIR मोहिमेवर विरोधकांना प्रत्युत्तर मतदार यादी विशेष पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर महाजन म्हणाले की, प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत असणे ही सर्वांची जबाबदारी आहे. “कार्यकर्ते लोकांना मदत करत असतील तर त्यात गैर काही नाही. सर्व पक्षांनी आपल्या मतदारांची नावे तपासून घ्यावीत. मात्र या प्रक्रियेत बोगस नावे निश्चितपणे वगळली जातील,” असे त्यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षणाबाबत अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात (ACR) त्यांच्या पर्यावरणविषयक कामाची नोंद व्हावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याचे महाजन यांनी सांगितले. त्याचबरोबर शहरांमध्ये झाडांच्या बुंध्याभोवती झालेले काँक्रीटीकरण काढून पावसाचे पाणी झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचावे, यासाठी नाशिकमध्ये विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे झाडे पडण्याचे प्रमाण कमी होईल आणि पर्यावरण संवर्धनाला मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाईवर भूमिका शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबत महाजन म्हणाले, “चूक करणारा कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. महिलेवर किंवा डॉक्टरवर हल्ला करणे चुकीचे आहे. अशा घटनांचे समर्थन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केलेले नाही. पक्षापेक्षा कायदा मोठा आहे.” दुसरीकडे, एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण मिळाल्याची पुष्टी करत महाजन म्हणाले की, त्या दिवशी पूर्वनियोजित महत्त्वाच्या कामानिमित्त ते बाहेरगावी असणार असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. मात्र त्यांनी खडसेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संबंधित बातमी वाचा.. विरोधकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी!:दिल्लीतील आंदोलकांवरील लाठीचार्जवरून प्रकाश आंबेडकरांची भाजप आणि काँग्रेसवर घणाघाती टीका
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी, संवाद आणि शांततापूर्ण आंदोलन हीच खरी लोकशाहीची ओळख असल्याचे सांगत, आंदोलकांचा आवाज दडपणे म्हणजे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
उद्धव ठाकरेंच्या पक्षात कार्यकर्ते उरले नाहीत:म्हणून ते दुसऱ्यांच्या आंदोलनात जातात- गिरीश महाजनांचा टोला; संजय राऊतांवरही केली टीका
