![]()
पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीने (ई-बाईक) अचानक पेट घेतल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेत अग्निशमन दलाने तत्परता दाखवत इमारतीत अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका केली आहे. चार्जिंगला लावलेल्या ई-बाईकचा भडका अग्निशमन दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (PRO) दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग भागात ही घटना घडली. एका रहिवाशाने आपली इलेक्ट्रिक दुचाकी तिथे चार्जिंगसाठी लावली होती. यादरम्यान दुचाकीमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि तिने थेट पेट घेतला. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इतर वाहनांनाही आगीचा धोका निर्माण झाला. धूर वरच्या मजल्यांवर, रहिवाशांची उडाली तारांबळ तळमजल्यावर लागलेल्या या आगीचा प्रचंड धूर वेगाने इमारतीच्या वरच्या मजल्यांवर पसरू लागला. धुराचे लोट घरात शिरू लागल्याने इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच घबराट उडाली आणि त्यांनी मदतीसाठी धावपळ सुरू केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अत्यंत वेगाने बचावकार्य सुरू करत इमारतीत अडकलेल्या दोन जणांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ई-वाहनांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. प्राथमिक तपासात ई-बाईकच्या बॅटरीमध्ये बिघाड झाल्याने किंवा ओव्हरचार्जिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे. या घटनेमुळे शहरात वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आणि रहिवासी भागात केल्या जाणाऱ्या त्यांच्या चार्जिंगच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने उपस्थित झाला आहे. याप्रकरणी पोलिस आणि अग्निशमन दलाकडून पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा.. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:इथेनॉल टँकर पलटल्याने सुरू होती एकेरी वाहतूक, ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; 6 जणांचा मृत्यू समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, अपघात होताच कारने अचानक पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत कारमधील चार जणांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि ते आतच जिवंत होरपळले. तर धडक देणाऱ्या मालवाहू वाहनातील दोन व्यक्तीचांही मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीला भीषण आग:चार्जिंगला लावलेल्या ई-बाईकचा भडका, दोघांची सुटका; सुदैवाने जीवितहानी टळली
