![]()
सामान्यतः वयाची सत्तरी पार केल्यानंतर लोक विश्रांती घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेलच्या मुरलीधर पाटील (७२) या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या उमेदीला वयाचे बंधन घालू दिले नाही. पाटील यांनी आपल्या वयाच्या ७२ व्या वर्षी केवळ स्वतः राबून नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपल्या शेतातील केळी थेट आखाती देशांमध्ये निर्यात करण्याची किमया साधली आहे. पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून केळीची शेती करत आहेत. यापूर्वी ते पारंपरिक पद्धतीने कंद लावून केळी घ्यायचे. मात्र, परदेशी बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांनी काळाची पावले ओळखली. त्यांनी कंदाची शेती सोडून जैन कंपनीच्या ‘जी-नाईन’ (जी-९) या सुधारित टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली. या आधुनिक रोपांमुळे आणि योग्य नियोजनामुळे त्यांच्या शेतात निर्यातीसाठी लागणारा उच्च दर्जाचा माल तयार झाला, ज्यामध्ये केळीच्या एका घडाचे सरासरी वजन २३ किलो आणि फळाची लांबी ९ इंचापर्यंत भरली. परदेशात निर्यात होणाऱ्या मालासाठी रासायनिक खतांचा वापर टाळणे गरजेचे असते. यासाठी पाटील यांनी घरच्या घरी गोमूत्र, गूळ, शेण आणि डाळीचे पीठ एकत्र करून ‘जीवामृत’ तयार केले. २०० लिटरच्या टाकीमध्ये हे मिश्रण आठ दिवस भिजू देऊन ठिबक सिंचनाद्वारे केळीला दिले. यामुळे झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आणि यंदा संपूर्ण बागेवर एकही रोग आला नाही. व्यापारी थेट बांधावर; वाहतूक, दलाली खर्चाला कायमचा ब्रेक! या दर्जेदार केळीची माहिती मिळताच परदेशी निर्यातदार थेट पाटील यांच्या शेतात पोहोचले. शेतकऱ्याला बाजारात जाण्याची किंवा वाहतुकीचा खर्च करण्याची गरजच उरली नाही. व्यापाऱ्यांनी स्वतःचे मजूर आणि बॉक्स आणून शेतातूनच मालाची खरेदी केली. स्थानिक बाजारापेक्षा परदेशी बाजारात माल गेल्यामुळे पाटील यांना प्रति क्विंटल तब्बल ४०० ते ५०० रुपये अधिक दर मिळाला. नऊ एकरातील हा सर्व माल मार्च, जून आणि जुलै या तीन महिन्यात कटिंग होऊन निर्यात झाला. उत्पन्न आणि खर्चाचे अर्थकारण पाटील यांनी नऊ एकर क्षेत्रावर प्रति रोप २१ रुपयांप्रमाणे रोपे आणून ९ एकर क्षेत्रांवर गतवर्षी जुलै महिन्यात लागवड केली. यात रोप, औषधी, संगोपन याचा एकत्रित मिळून १२ लाखांपर्यंत खर्च करावा लागला. यंदा तीन टप्प्यात ताेडणी करण्यात आली. यात मार्चमध्ये केळीला १७०० ते १८०० रुपये, जूनमध्ये २२०० ते २३०० रुपये, तर जुलै महिन्यात सर्वाधिक २७०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सरासरी एकूण ४२ लाखांचे उत्पादन मिळाले. निव्वळ नफा ३० लाखांपर्यंत झाला. व्यापाऱ्यांनी थेट बांधावर येऊन केळी खरेदी केल्याने त्यांचा वाहतूक खर्चही वाचला शेतकरी मोबाइल नंबर : 9922258498
प्रगतिशील शेतकरी:72 व्या वर्षी आखाती देशात केळी निर्यातीची साधली किमया, एका वर्षात 42 लाखांचे उत्पादन, मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याचा प्रयोग
