![]()
अमरावती महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारीऐवजी आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे राजकीय पक्षांची गट नोंदणीसाठीची घाई कमी झाली असून, तीन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी एकही गट नोंदणी प्रस्ताव दाखल झाला नाही. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीला विलंब झाल्याने तसेच गट नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ असल्याने राजकीय पक्षांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे, आज मंगळवारी कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा अपक्ष नगरसेवकांनी गट नोंदणीसाठी दावा दाखल केला नाही. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मंगळवारी गट नोंदणीसाठी दावा दाखल केला जाण्याची शक्यता होती. मात्र, प्रत्यक्षात यापैकी कुणीही दावा दाखल केला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश मार्डीकर यांनी गट नोंदणीची सविस्तर माहिती जाणून घेतली असून, येत्या एक-दोन दिवसांत दावा दाखल केला जाईल. अमरावती महानगरपालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात युवा स्वाभिमान पक्षाचे १५ नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे (शिंदे गट) तीन सदस्य आहेत. याशिवाय, भाजपचे सर्वाधिक २५, काँग्रेसचे १५, एमआयएमचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ११, बहुजन समाज पार्टीचे ३, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दोन आणि वंचित बहुजन आघाडीचा एक नगरसेवक आहे. येत्या काही दिवसांत काही नगरसेवक आपापसात ताळमेळ जुळवून गट नोंदणी करतील किंवा स्वतंत्रपणे गट नोंदणी करतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आणि युवा स्वाभिमान पक्षाने यापूर्वी दाखल केलेले गट नोंदणीचे दावे आज मंजूर करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दोन्ही गटांच्या सर्व नगरसेवकांची ओळख पटवून या दोन्ही गटांना मंजुरी दिली आहे. तसे पत्र मनपा आयुक्तांना लगेच पाठवण्यात आले आहे. शिवसेना (शिंदे गट) तर्फे डॉ. राजेंद्र तायडे यांनी, तर युवा स्वाभिमान पक्षाकडून गटनेते नाना आमले यांनी गट नोंदणीसाठी अर्ज दाखल केला होता.
अमरावती महापौर निवडणूक लांबली, गट नोंदणीला दिलासा.:सुटीनंतरही मंगळवारी एकही गट नोंदणी प्रस्ताव दाखल नाही
