![]()
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यात येऊन हात-पाय मोडण्याची धमकी देणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना मुंब्र्यात प्रत्यक्ष जात चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना आव्हाड यांनी मुंब्रा शहराच्या संस्कृतीचा दाखला दिला. मुंब्रा शहराची ओळख ही महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि संस्कारांशी जोडलेली आहे. हे शहर जात, धर्म आणि भाषेच्या पलीकडे जाऊन विचार करते, म्हणूनच इथली एकता टिकून आहे. अशा शहरात धर्मांध भाषा वापरणे अत्यंत धोकादायक असून, मुंब्र्यात कोणताही एक विशिष्ट रंग चालणार नाही, तर इथे फक्त आणि फक्त तिरंगाच चालेल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. नवनियुक्त नगरसेविका सहर शेखने केलेल्या टीकेवर भाष्य करताना आव्हाड म्हणाले की, सहर शेख ही लहान मुलगी आहे, त्यामुळे मी तिच्याकडे लक्ष देणार नाही. मात्र, धमकीची भाषा करणाऱ्यांना इशारा देताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण जर बोलायला लागलो तर भलेभले तुरुंगात जातील. कोणीही धमकीची भाषा करू नये, ती इथे चालणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. मुंब्र्याची शांतता आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी या माध्यमातून कडक इशारा दिला आहे. युनूस शेख यांनी दिलेल्या धमकीला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कुणीही म्हणतं की जितेंद्र आव्हाडला मुंबऱ्यात पाय ठेवू देणार नाही, म्हणून मी येणार नाही असे वाटले का? जितेंद्र आव्हाडला एक लाखाहून अधिक मतांनी या शहराने जिंकवले आहे, हे लोकांचे प्रेम आहे. त्यामुळे हे ‘आके दिखावो, जाके दिखावो’ ही भाषा चालणार नाही. राजकारणात दोन चार दिवस टीका टिप्पणी सुरू असते, मला त्याची सवय आहे. पण मी जर तोंड उघडले तर भल्याभल्यांची झोप उडेल. मी शांत बसलोय, माझ्याकडे असे अनेक प्रकरण आहेत की ज्यामुळे अनेकजण तुरुंगात जातील. त्यामुळे मुंब्र्यात आल्यानंतर पाय मोडेन, असे करेन, ही भाषा चालणार नाही असा दमही जितेंद्र आव्हाड यांनी दिला. पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, या शहराच्या स्टेशनवरुन मिनारीकडे बघितलं तर समोर मुंब्रा देवीचं मंदिर दिसतं. इथले रस्ते हे भारताची ओळख आहेत. तुम्ही या शहराला कोणत्याही एका रंगाने माखू शकणार नाही, कारण हे शहर संविधानाने बांधले गेले आहे. हे शहर महात्मा गांधी, नेहरू-आंबेडकरांच्या विचाराने चालणारे आहे. हे शहर तिरंग्याचे आहे आणि तिरंग्याचेच राहणार. आपण आपले काम करुयात. 10 नगरसेवक निवडून आले आहेत. या शहराला स्वच्छतेची, मार्केटची, बस डेपोची, चांगल्या रस्त्यांची गरज आहे. हे सगळे देण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे आणि आम्ही ते करुन दाखवू. सत्ता अशा लोकांच्या नादी लागू नका की त्यामुळे पुन्हा 1993 किंवा 2004 ची पुनरावृत्ती होईल. सत्ता अशा लोकांच्या हाती जाऊ देऊ नका ज्यामुळे मुंब्रा बदनाम होईल, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज आपली मुलं मोठ्या महाविद्यालयात शिकायला जातात ते अभिमानाने जातात. मुंब्र्याला तुलनेने चांगल्या सुविधा दिल्या आणि सुधारणा केली. चॉकलेट खिलाया… असे बोलत आमचे नवीन लोक माध्यमांसमोर जाणार नाहीत असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सहर शेखच्या भाषणाची खिल्ली उडवली. हारलोय याचा अर्थ थांबलोय असे नाही. पुढच्या पाच वर्षानंतरची लढाई आज सुरू झाली आहे असेही ते म्हणाले. जर असे कुणी काय म्हटले तर सोडून द्या. त्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही. लहान मुलगी आहे, तिच्याकडे प्रेमाने पाहा. एक तिकीट आहे आणि 40 लोक मागत असतील तर ते एकालाच मिळणार ना. नाराजी असू शकते, याची मला जाणीव आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्यावर टीका करणाऱ्यांबद्दल माझ्या मनात कधीही तिरस्कार असणार नाही. या शहराने मला प्रेम दिले आणि मीही शहराला प्रेम परत देणार. 2009 साली हे शहर मला ओळखत नव्हते, त्यावेळीही माझ्यावर प्रेम केले, त्यांनी मला निवडून दिले. माझे नाते हे माणुसकीशी आहे, हेच आमचे नाते आहे. त्यामुळे मला किती जरी उकसवायचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही. हे जग प्रेमाने जिंकले जाते आणि पुढेही जाईल.
मुंबऱ्यात कोणताही एक विशिष्ट रंग चालणार नाही:इथे फक्त आणि फक्त तिरंगाच चालेल, जितेंद्र आव्हाड यांचा जोरदार हल्लाबोल
