लहान मनाचे लोकच सन्मानाला विरोध करतात:कोश्यारींच्या पद्मभूषणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार; वाद चिघळला




माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या सन्मानाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पलटवार करत टीकाकारांना कोत्या मनाचे लोक असे संबोधले आहे. कोश्यारी यांचे आयुष्य दीर्घकाळ सार्वजनिक सेवेला वाहिलेले असून त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, पद्मभूषण पुरस्काराचा मुद्दा आता थेट लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडला जात आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची घोषणा करत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण देण्याचा निर्णय घेतला. कोश्यारी यांनी 2019 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली होती. या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यात सक्रिय भूमिका बजावल्याचा आरोप केला. राऊत यांच्या मते, निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करून भाजपचे सरकार सत्तेत आणण्यासाठी कोश्यारी यांनी घटनात्मक पदाचा गैरवापर केला आणि त्यामुळे लोकशाही व संविधानाची हत्या झाली. संजय राऊत यांनी पुढे दावा केला की, कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या अनेक निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि काही निर्णय बेकायदेशीर ठरवले होते. अशा पार्श्वभूमीवर अशा व्यक्तीला पद्मभूषणसारखा सन्मान देणे हे देशासाठी चुकीचा संदेश देणारे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी माध्यमांशी बोलताना कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा मुद्दाही पुन्हा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे कोश्यारी यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. त्या वक्तव्यानंतर राज्यभर आंदोलनं झाली होती आणि विविध संघटनांनी निषेध नोंदवला होता. याचबरोबर संजय राऊत यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कोश्यारी यांनी केलेल्या विधानांवरही टीका केली. समाजसुधारकांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान होणे हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी महायुती सरकारने या निर्णयाला विरोध करायला हवा होता, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोश्यारी यांना त्यांच्या कार्यासाठीच पुरस्कार या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाम भूमिका घेतली. त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करत त्यांच्या दीर्घ आणि सन्माननीय सार्वजनिक जीवनाचा उल्लेख केला. देशसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून ते पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, ज्यांचे विचार संकुचित आहेत, असेच लोक अशा सन्मानाला विरोध करतात. कोश्यारी यांना त्यांच्या कार्यासाठीच हा पुरस्कार मिळाला असून त्यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पलटवारानंतर पद्मभूषण पुरस्काराचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *