![]()
राज्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असतानाच मुंबई आणि भिवंडी येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या, पण तितक्याच धक्कादायक घटनांनी सर्वांनाच हादरवून टाकले आहे. मुंबईतील विक्रोळी टागोर नगर परिसरात निष्काळजीपणामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला, तर भिवंडीत घरगुती वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे कायदा-सुव्यवस्था, निष्काळजीपणा आणि वाढत्या हिंसाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकीकडे उत्सवाच्या तयारीतून झालेली दुर्घटना, तर दुसरीकडे कौटुंबिक वादातून झालेला खून, अशा दोन घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. मुंबईतील विक्रोळी टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमासाठी लावण्यात आलेला मोठा स्पीकर अचानक कोसळून एका तीन वर्षांच्या मुलीवर पडला. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, त्यात स्पीकर पडताच चिमुकली खाली अडकताना दिसत आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, चिंध्या गोळा करणाऱ्या एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे हा स्पीकर हलल्याचा आणि अपघात घडल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून, विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान लावण्यात येणाऱ्या स्पीकर्स, मंडप आणि इतर साहित्याची सुरक्षितता तपासली जाते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एका निष्पाप चिमुकलीचा बळी गेल्यानंतरही जबाबदारी नेमकी कोणाची, यावर चर्चा सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा निर्घृण खून दरम्यान, भिवंडी शहरातूनही तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील न्यू आझाद नगर, शांतीनगर परिसरात नवरा-बायकोच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. मामा हॉटेलजवळील न्यू आझादनगर झोपडपट्टीत ही घटना घडली. दिलशाद शहा असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या मावस बहिणी आणि तिच्या पतीमधील कौटुंबिक वाद शांत करण्यासाठी गेला होता. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून बहिणीच्या पतीचे भाऊ आसिफ अब्दुलहकीम शहा, अलिहसन अब्दुलहकीम शहा आणि मुजफ्फर अब्दुलहकीम शहा यांनी संगनमत करून दिलशाद शहा याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दिलशाद शहा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी आणि मृतक हे परस्पर नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे.
प्रजासत्ताक दिनाला शोककळा; विक्रोळीत स्पीकर कोसळून चिमुकलीचा मृत्यू:मुंबईत निष्काळजीपणाचा बळी, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
