पुण्यात बॅडमिंटन स्मारक आणि स्टेडियम उभारणार:महापौर मंजुषा नागपुरेंची घोषणा; पीडीएमबीएकडून खेळाडूंवर कौतुकाची थाप
![]()
पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम आणि ‘दू पूना गेम मेमोरियल’ स्मारक उभारण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही घोषणा केली. बॅडमिंटन खेळाचा जन्म पुण्यात झाला हे जगाला दाखवण्यासाठी हे स्मारक उभारले जाईल, असे महापौर म्हणाल्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन पुण्यात करता यावे, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांसाठी पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन असोसिएशनचे (पीडीएमबीए) सहकार्य अपेक्षित असल्याचे महापौरांनी नमूद केले. दरम्यान, पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन असोसिएशनच्या (पीडीएमबीए) वतीने गुणवंत खेळाडू, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. पीडीएमबीएच्या ८० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीनिमित्त विशेष ‘लोगो’चे अनावरणही यावेळी करण्यात आले. शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या सोहळ्यात विविध वयोगटातील आणि विभागातील १५० गुणवंत खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पंच सीए गिरीश नातू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना गिरीश नातू यांनी युवा खेळाडूंना एकत्रित सरावाचे फायदे सांगितले. तसेच, पुण्यातील विविध बॅडमिंटन अकादमींचे मानांकन करण्याची सूचनाही त्यांनी संघटनेला केली. या सोहळ्याला पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, ज्येष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, मानद सरचिटणीस सीए रणजित नातू, खजिनदार सारंग लागू यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर मंजुषा नागपुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पुण्यातील बॅडमिंटन सुविधा तांत्रिकदृष्ट्या अचूक असाव्यात आणि त्यांचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने व्हावे, यासाठी महानगरपालिका पीडीएमबीए सोबत काम करेल. स्मारक उभारण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जा राखण्यासाठी संस्थेचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पुण्यातील बॅडमिंटनपटूंना सुविधांसाठी बाहेर जाण्याची गरज पडू नये, यासाठी उदयोन्मुख खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा मिळतील आणि ते उच्च ध्येये गाठू शकतील, असा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. पुणे महानगरपालिका क्रीडा पर्यटनाला चालना देण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही महापौरांनी नमूद केले. पी. ई. सोसायटीने आजवर पीडीएमबीएला सहकार्य केले आहे, तसेच ते भविष्यातही कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
