भोंदू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी:सरकारी वकिलावर भोंदूबाबाचे वकील पडले भारी, सुनावणीवेळी कोर्टात काय घडले?
![]()
महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी घेरलेला भोंदू बाबा अशोक खरात याला आज न्यायालयाने दिलासा दिला आहे. तपास यंत्रणेने ८ व्या गुन्ह्यात खरातच्या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, आरोपीच्या वकिलांचा आक्रमक युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती बी. एन. ईचपुराणी यांनी त्याला १२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे. खरातचा रवानगी आता पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कारागृहात करण्यात येणार आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ आणि ‘कॉस्मोलॉजी’ तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातवर यापूर्वीच लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धेचा प्रसार यासारख्या विविध गंभीर आरोप आहेत. मार्च 2026 च्या अखेरीस त्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास एका विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला असून, या प्रकरणांचा तपास सुरू आहे. कोर्टात काय घडले? अशोक खरातला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी तपासाची गरज अधोरेखित करताना सांगितले की, खरातच्या ‘ओकस’ कार्यालयात झाडाझडती दरम्यान ‘काळा दगड’ आणि काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करताना तो काही विशिष्ट मंत्र पुटपुटत असे, त्याचा अर्थ आणि उद्देश शोधणे गरजेचे आहे. पीडित कुटुंबाची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचाही संशय असून, आरोपीच्या उपस्थितीत चौकशी करणे आवश्यक आहे. अशोक खरातच्या वकिलाचा युक्तिवाद काय? तपास यंत्रणेची पोलिस कोठडीची मागणी खोडून काढताना आरोपीच्या वकिलांनी तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “गेल्या नऊ गुन्ह्यांत ज्या गोष्टींचा तपास झाला, त्यात आता नव्याने काय शोधणार? काळा दगड आणि चिंचोक्यांचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची काय गरज?” आर्थिक फसवणुकीचा उल्लेख आधीच्या गुन्ह्यांमध्ये का नव्हता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सीसीटीव्ही फुटेज आणि मागील तपासाचे संदर्भ देत अशोक खरातच्या वकिलांनी पोलिस कोठडीची मागणी केवळ वेळ काढूपणा असल्याची भूमिका मांडली. फसवणूक प्रकरणात उद्या पुन्हा सुनावणी होणार दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने SIT ची पोलिस कोठडीची मागणी अमान्य केली. यामुळे अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. मात्र, खरातच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. ९ व्या गुन्ह्यात (फसवणूक प्रकरण) त्याचा पुन्हा ताबा मिळवण्यासाठी SIT ने न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार असून, उद्या त्याला पोलिस कोठडी मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… हवेतून काजू कतली अन् बंद फोनवर मंत्र; भोंदू खरातचा पर्दाफाश:सीएने ‘कुक’ पेरून फाडला भोंदूचा बुरखा, गुन्हा दाखल आई-वडिलांना ‘मृत्युयोग’ असल्याची भीती दाखवून तब्बल पावणेनऊ कोटी रुपये उकळणाऱ्या भोंदू खरातचा एका उच्चशिक्षित सीएने (चार्टर्ड अकाउंटंट) ‘फिल्मी’ स्टाइलने भंडाफोड केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सीएने भोंदूच्या फार्महाऊसवर थेट ‘कुक’च्या वेशात आपला माणूस पेरला व त्याच्या अश्लील पार्ट्यांचे पुरावे मिळवले. या पुराव्यांच्या आधारे आता सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरातविरोधात ८ कोटी ७६ लाखांच्या फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा…
