टीव्हीएस कंपनीच्या व्यवस्थापकाने अनेक धनादेश चोरले
नांदेड(प्रतिनिधी)-टी.व्ही.एस. या दुचाकी कंपनीत काम करणाऱ्या एका नोकराने व्यवस्थापक पद सांभाळत असतांना त्याच्याकडे असलेले अनेक धनादेश त्याने चोरून नेल्याचा प्रकार घडल्यानंतर न्यायालयाने आदेश दिले आणि त्यानंतर वजिराबाद पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल वाहाब अब्दुल वली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1990 ते 2022 दरम्यान त्यांच्या दुचाकी एजन्सी टीव्हीएस मोटार लि.मिलरोड नांदेड येथे मिर उस्मानअली उर्फ अमजद मिर सिराज अली (50) हे व्यक्ती कार्यरत होते. ते नांदेडमधील पिरबुऱ्हाननगर भागाचे रहिवासी आहेत. 31 मे 2022 पर्यंत ते या दुचाकी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. 2021-2022 मध्ये अब्दुल वाहाब यांची तब्बेत बिघडली आणि त्यांना पक्षाघात झाला. हे कळाल्याने मिर उस्मान अलीने त्या टीव्हीएस एजन्सीमध्ये होणारा नफा जवळपास 4 ते 5 कोटी रुपये कंपनीतून काढून घेण्यास सुरूवात केली. अब्दुल वाहब यांचे एक्सीस बॅंकेचे स्वाक्षरी केलेले बरेच कोरे धनादेश त्याच्याकडे होते आणि ते त्यांच्याकडे विश्र्वासाने देण्यात आले होते. त्यानंतर ते धनादेश त्यांनी इतरांना देवून पैसे काढायला लावले. असा हा अपहार घडला आणि इतर धनादेश चोरुन नेले. या प्रकरणी सुरूवातीला पोलीसांनी दखल घेतली नाही म्हणून अब्दुल वाहाब अब्दुल वली यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात ऍड.जे.एस.सुखमणी यांनी सादरीकरण केल्यानंतर न्यायालयाने वजिराबाद पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर वजिराबाद पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 420, 467, 468, 471, 405, 379 प्रमाणे गुन्हा क्रमांक 11/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे हे करीत आहेत.
Post Views: 71