विठ्ठल दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला:पंढरपूरजवळ भीषण अपघातात डोंबिवलीचे 4 जण ठार; क्रूझर आणि कंटेनरची समोरासमोर धडक




पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील शरद नगर येथे आज सायंकाळी एक अतिशय भीषण अपघात झाला. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन रेल्वे पकडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रूझर जीपला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली. या समोरासमोर झालेल्या धडकेत डोंबिवली (जि. ठाणे) येथील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. योगिनी अमोल केकाने (रा. डोंबिवली), सविता संतोष गुप्ता (रा. डोंबिवली), राजश्री कदम (रा. डोंबिवली), आदित्य अजय गुप्ता (वय १४ वर्षे, रा. डोंबिवली), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक ठाणे जिल्ह्याचे रहिवासी असून सुट्ट्यांच्या निमित्ताने देवदर्शनासाठी आले होते. त्यांनी ठाण्याहून सोलापूरला रेल्वेने प्रवास केला. सकाळी सोलापूरला पोहोचल्यावर त्यांनी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. त्यानंतर अक्कलकोटवरून भाड्याने क्रूझर जीप (MH 13 BN 7687) करून ते पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले. पांडुरंगाचे दर्शन घेऊन सायंकाळी पुन्हा रेल्वे पकडण्यासाठी सोलापूरच्या दिशेने जात असतानाच शरद नगर येथे त्यांच्या गाडीला कंटेनरने (MH 46 BU 6651) जोरदार धडक दिली. मृतदेहांची ओळख पटवणेही झाले कठीण अपघात इतका भीषण होता की क्रूझर जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतदेहांची अवस्था इतकी छिन्नविच्छिन्न झाली होती की, सुरुवातीला त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या घटनेत क्रूझर चालक नागनाथ होलीकट्टे हा देखील जखमी झाला आहे. या अपघातात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एका अल्पवयीन मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने सोलापूर येथील सीएनएस (CNS) हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघाता दरम्यान या वाहनातून प्रवास करणारी महिला भाविक बेपत्ता असून ती महिला अद्याप सापडली नाही , त्या महिलेच्या मोबाईलचे शोध घेतला असता त्याचे लोकेशन फलटण दाखवत असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर या मार्गावर सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून आणि प्रयत्नांची पराकाष्टा करून वाहतूक पूर्ववत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *