गिरीश महाजनांना बाबासाहेबांचे नाव न घेणे भोवणार:आंबेडकरांची अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी; महिला अधिकाऱ्याशी संवाद




वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गिरीश महाजन यांचे कृत्य अ‍ॅॅट्रोसिटीचा गुन्हा आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः यासंबंधीचा कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडेन, असे त्यांनी म्हटले आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. भारताने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंगीकृत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे साहजिकच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्याचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. पण गिरीश महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात एकदाही बाबासाहेबांचे नाव घेतले नाही. ते विसरले की त्यांनी ते जाणिवपूर्वक टाळले हे स्पष्ट झाले नाही. पण माधवी जाधव नामक पोलिस अधिकाऱ्याने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी या प्रकरणी तीव्र रोष व्यक्त महाजनांना जाब विचारला. आंबेडकरांचा माधवी जाधवांशी फोनवरून संवाद प्रकाश आंबेडकरांनी या महिला अधिकाऱ्याशी फोनवरून संवाद साधला. त्यात त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर अ‍ॅॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल. आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे आंबेडकर म्हणाले. रोहित पवारांनी व्यक्त केला संताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनीच बाबासाहेबांच्या नावाचा विसर मंत्र्यांना पडत असेल तर याहून मोठे दुर्देव काय असू शकते ? भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अमुल्य असून एखाद्या मंत्र्याच्या भाषणातील अनुल्लेखाने बाबासाहेबांचे योगदान पुसता येणारे नाही. असो नाशिकमध्ये घडलेली घटना नकळत झाल्याचे मान्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी अशा चुका होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. संबंधित महिला अधिकारी यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय योग्य आणि भारतीय प्रजासत्ताकाविषयी प्रेम दर्शवणारी असून त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठलीही कारवाई होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी! गिरीश महाजनांवर संतापून काय म्हणाल्या होत्या माधवी जाधव? माधवी जाधव म्हणाल्या, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात कुठेही बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. जी व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघालात? पालकमंत्र्यांची ही फार मोठी चूक आहे. त्यांनी आपली चूक मान्य केली पाहिजे. मला मीडियाशी देणे घेणे नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला निलंबित करायचे असेल तर खुशाल करा. पण बाबासाहेबांना संपवण्याचे काम मी करू देणार नाही. यावेळी अन्य एक महिला पोलिस अधिकारी माधवी जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी माधवी त्यांना म्हणाल्या, मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्रीही संविधानामुळे आहेत. बाबासाहेबांचे नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचे नाव एकदाही भाषणात आले नाही. लोकशाही व संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावे वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा व प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचे नाव भाषणात का आले नाही? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *