पद्मभूषण RSS, संघ कार्यकर्त्यांना समर्पित:भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया; मी संघ स्वयंसेवक म्हणत विरोधकांनाही डिवचले




महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत संविधानाची हत्या करण्यासाठी कोश्यारींना पद्मभूषण दिला काय? असा प्रश्न केला होता. कोश्यारी यांनी सोमवारी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. मी संघ स्वयंसेवक आहे. मी भारतमातेचे काम करतो. हे काम करताना कुणाला वाईट वाटत असेल तर मी काय करणार? असे ते म्हणालेत. भगतसिंह कोश्यारी हे 2019 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधान केले होते. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे सरकार उलथावून लावण्यातही त्यांचे काही निर्णय कारणीभूत ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यामुळे त्यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी उपरोक्त सवाल केला आहे. काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी? भगतसिंह कोश्यारी यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, मी टीव्ही पाहत नाही व रेडिओही ऐकत नाही. लोकांचे मला अभिनंदाचे फोन आले. एका सामान्य कार्यकर्त्याला पद्मभूषण पुरस्कार दिल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान मोदी यांचा आभारी आहे. मला विश्वास आहे की, आता आमचे संघ कार्यकर्ते समाजासाठी आणखी निस्वार्थपणे काम करतील. मी हा पुरस्कार संघ व त्याच्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो.

ते पुढे म्हणाले, सामान्यतः एखाद्याला असा पुरस्कार मिळतो तेव्हा तो कुणालातरी समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली जाते. आज मी जो काही आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ स्वयंसेवकांच्या प्रेमामुळेच आहे. मी म्हणेन की, हा सन्मान आपल्या प्रिय लोकांसाठी आहे. माझी कुणी प्रशंसा करावी किंवा निंदा करावी म्हणून मी काम करत नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. भारतमाता माझ्यासाठी सर्वकाही आहे. त्यासाठी मी काम करत असतो आणि काम करत राहणार. हे काम करताना कुणाला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करणार? काय म्हणाले होते संजय राऊत? भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण दिल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते, महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून मविआचे सरकार उखडून टाकले. त्यांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. हा पुरस्कार संविधानाची हत्या करण्यासाठी दिला आहे का? असा प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *