![]()
भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि नवमतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय मतदार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनजागृती रॅलीला विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तहसीलदार विनायक मगर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “भारतीय लोकशाहीची खरी ताकद मतदारांमध्ये आहे. जेव्हा प्रत्येक नागरिक आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावेल, तेव्हाच लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी बनेल. आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत, त्यामुळे त्यांनी आतापासूनच मतदानाचे मूल्य समजून घेणे काळाची गरज आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार विजयकुमार गायकवाड, श्रीमंत सारणे, निवडणूक पर्यवेक्षक बसवराज गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “मी नक्की मतदान करीन” अशी सामूहिक शपथ घेऊन लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. या उपक्रमामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज गुरव यांनी केले, तर समीर मणियार यांनी आभार मानले. जागा व्हा, सजग व्हा, मतदान करा, अशा घोषणांनी दुमदुमला परिसर शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध फलक हातात घेऊन लोकशाहीचा जयघोष केला.माझा मतदानाचा हक्क- माझी लोकशाहीची ताकद, ”एक मत- अनेक बदल,जागा व्हा, सजग व्हा, मतदान करा, अशा घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला होता.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली:‘ लोकशाही बळकट करा''चा संदेश, शेकडो विद्यार्थी सहभागी
