![]()
रेल्वे स्टेशन रोडवरील पदमपुरा भागातील तब्बल 150 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्राचीन हनुमान मंदिरात मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी मूर्तीवरील दागिन्यांसह रोकड लंपास केली. तर दागिन्यांची ओरबडताना मूर्तीचेही विद्रुपीकरण झाले. ही घटना शनिवारी (24 जानेवारी) उघडकीस आली. याप्रकरणी मंदिर विश्वस्त आणि लोकप्रतिनिधींनी मूर्तीची डागडुजी केल्यानंतर दुपारी 3 वाजता भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी परिसरातील नागरिकांनी चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली. रेल्वे स्टेशन रोडवरील पदमपुरा भागात 150 वर्षे प्राचीन हनुमान मंदिर आहे. या मंदिराची देखरेख व स्वच्छतेचे काम लक्ष्मीबाई चक्रवार पाहतात. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्या मंदिराला कुलूप लावून घरी गेल्या. नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्या मंदिर उघडण्यासाठी आल्या असता त्यांना मंदिराच्या चॅनेल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बारवाल यांना माहिती दिली. बारवाल यांनी मंदिरात धाव घेतली असता, मूर्तीवरील सोन्याचा टिळा, चांदीच्या भुवया, पायातील चांदीचे कडे, डोळे आणि त्रिशूळ गायब असल्याचे दिसले. चोरट्यांनी दानपेट्या फोडून २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. घटेनची माहिती मिळताच छावणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. चोरीमागे चांदीचे वाढते दर गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने, मौल्यवान धातूंच्या चोरीसाठी हे कृत्य केल्याची चर्चा परिसरात आहे. चोरट्यांनी केवळ मूर्तीवरील सोन्या-चांदीच्या अलंकारांना लक्ष्य केल्याने आणि दानपेटीतील रोकड पळवल्याने, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा नियोजित कट असावा, अशी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. असा रचला चोरीचा कट पदमपुरा मंदिर चोरीचा तपास करताना चोरट्यांनी पद्धतशीर कट रचल्याचे समोर आले आहे. चोरटे रेल्वे स्टेशनकडून आले होते. संशय येऊ नये म्हणून त्यांनी मंदिरापासून 200 मीटर लांब वाहने उभी केली. प्रत्यक्ष चोरीसाठी दोन जण मंदिरात शिरले, तर उर्वरित टोळी पाळत ठेवून होती, पोत्यामध्ये ऐवज नेला. हातोडीच्या साहाय्याने काढले दागिने चोरट्यांनी मूर्तीवरील दागिने काढण्यासाठी छन्नी आणि हातोड्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. सोन्या-चांदीचे अलंकार मूर्तीमध्ये घट्ट बसवलेले असल्याने, ते काढण्यासाठी या हत्यारांनी प्रहार करण्यात आले. अलंकार काढल्यानंतर चोरटे पसार झाले. आयुक्तांना निवेदन; चार पथके रवाना या घटनेनंतर सर्व राजकीय नेत्यांनी आणि शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चोरट्यांना अटक करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने चोरट्यांच्या शोधासाठी चार विशेष पथके तैनात केली आहेत. देवाला सोडले नाही मी दररोज पहाटे स्वच्छतेसाठी येते, पण आज गेटचे कुलूप तुटलेले पाहून पाय लटलटले. आत पाहिले तर मारुतीरायांचे दागिने नव्हते, दानपेट्या रिकाम्या होत्या. हे पाहून खूप वाईट वाटले, चोरट्यांनी देवाला सुद्धा सोडले नाही. लक्ष्मीबाई चक्रवार, कर्मचारी. अर्ध्या तासात चोरी; 8 कॅमेऱ्यांत कैद मंदिरातील 8 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये कैद झाला आहे. पहाटे 3 ते 3:30 या अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी ही कृत्य उरकले. दोन चोरटे चोरी करून ऐवज गोण्यांमध्ये भरून पसार झाले. लोकप्रतिनिधींची धाव; महाआरतीने मंदिर दुमदुमले घटनेची माहिती मिळताच माजी महापौर विकास जैन, नगरसेविका हर्षदा शिरसाट, नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. मूर्तीचे विद्रुपीकरण झाल्याने भाविकांमध्ये मोठा संताप होता. तातडीने मूर्तीची डागडुजी करण्यात आली आणि दुपारी ३ वाजता महाआरतीचे आयोजन करून चोरट्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते.
संभाजीनगरच्या पदमपुऱ्यातील हनुमान मंदिरात चोरी:मूर्तीचे दागिने अन् रोख पोत्यात नेली, मूर्तीच्या भुवया, पायातील कडे, त्रिशुळासह 2.82 लाखांचा मुद्देमाल लंपास
