पुण्यातील रासायनिक कंपनीत गॅस गळती:24 जण रुग्णालयात, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
![]()
पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका रासायनिक कंपनीत गुरुवारी मध्यरात्री भीषण गॅस गळती झाली. या घटनेमुळे २२ नागरिक आणि दोन अग्निशमन दलाचे जवान अशा एकूण २४ जणांना श्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. गंगाधाम चौकाजवळील आईमाता मंदिर परिसरातील ‘७ डिजिट कंपनी’ या एलईडी कटिंग कंपनीत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एका टाकीतून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. वायूचा उग्र वास संपूर्ण परिसरात पसरल्याने झोपेत असलेल्या नागरिकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचा तीव्र त्रास जाणवू लागला. कंपनीतून विषारी वायू बाहेर पडत असल्याचे लक्षात येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी आणि सुमारे ३० जवानांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. वायू गळतीचे स्वरूप गंभीर असल्याने जवानांनी तात्काळ ‘बी. ए. सेट’ (Breathing Apparatus) परिधान करून कंपनीच्या आत प्रवेश केला. दलाच्या बी. ए. सेट वाहनासह चार अग्निशमन गाड्यांनी गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बचावकार्यादरम्यान १७ नागरिकांना श्वसनाचा प्रचंड त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दलाने तात्काळ शासकीय रुग्णवाहिका १०८ च्या मदतीने १४ नागरिकांना उपचारासाठी ससून आणि इतर रुग्णालयांत हलवले. या मोहिमेत नागरिकांचे प्राण वाचवताना अग्निशमन दलाचे ज्ञानेश्वर कदम (वय २६) आणि धनंजय भिसे (वय ३४) या दोन जवानांनाही विषारी वायूची बाधा झाली. त्यांनाही तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाधित झालेल्यांमध्ये पिसळ आणि गायकवाड कुटुंबातील सदस्यांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये ११ महिन्यांचा मल्हार पिसळ, ७ वर्षीय समिधा पिसळ, ८ वर्षीय लखन गायकवाड यांसारख्या लहान मुलांसह ७८ वर्षीय प्रकाश पिसळ आणि ७५ वर्षीय प्रभावती पिसळ यांसारख्या ज्येष्ठांचाही समावेश आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा धोका टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, मध्यरात्रीची वेळ असल्याने परिस्थिती आव्हानात्मक होती, मात्र बी. ए. सेटचा प्रभावी वापर करून जवानांनी गळती रोखली आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून, पोलीस आणि संबंधित विभागाकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
