शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी‎ पाणी बचत करणे हाच एकमेव मार्ग‎:नेवासेत घुमला जल व्यवस्थापनाचा नारा, खडका फाटा येथे जलजागृती‎

0
app_177746805369f202957ee0f_907168.jpg




प्रतिनिधी | नेवासे फाटा पाणी बचत करून शेतकऱ्यांचा भविष्यकाळ उज्वल होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा पाणी वापर संस्था सक्षमीकरण चळवळीतील कार्यकर्ते बाबुलाल पटेल यांनी व्यक्त केले. मुळा पाटबंधारे विभागाच्यावतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा निमित्ताने खडका फाटा येथील अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक महाविद्यालय येथे आयोजित पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र व कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मारुतराव घुले पाणी वापर संस्थेचे सचिव ज्ञानदेव पाडळे, उपविभागीय अधिकारी संदीप पवार, अभिषेक पवार, चिलेखनवाडी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल देशमुख उपस्थित होते. पटेल यांनी पाणी वापर संस्थेच्या किरकोळ अडचणीपासून ते मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अडचणी कोणत्या पातळीवर सोडवल्या पाहिजेत यावर भाष्य केले. काही अडचणी स्थानिक असल्यास त्या आपापसात सोडवण्याचे आवाहन केले तसेच आपापसातील संघर्ष पाटचाऱ्यांवर येणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाटबंधारे विभागामार्फतही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले जाते. तेव्हा आपण पाणी बचत करून शेतकऱ्यांचा भविष्यकाळ उज्वल होण्यासाठी प्रयत्नशील व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निलेश देहडराय यांनी पाटबंधारे विभागाच्यावतीने पाणी वापर संस्था कायदा सन २००५ नियम २००६ बाबत माहिती दिली. कालवा निरीक्षक साठे यांनी पाणी वापर संस्था सक्षमीकरणाबाबत विचार व्यक्त केले. शाखाधिकारी जितेंद्र कावले यांनी पाणी वापर संस्था आणि शेतकरी यांच्यातील समन्वय योग्य असल्यास शेतकऱ्यांचा आणि शासनाचाही फायदा होईल व मोठ्या प्रमाणावर पाणी बचत होईल याबद्दल मार्गदर्शन केले. नवनाथ शिरसाठ, बाळू मरकड, अभिजित देशमुख, विकास घोक्षे, महेश कंठाळी, रवी यादव, महेश ठुबे, श्रीकांत करंजे, दिपाली चव्हाण, स्वाती साठे, कोमल शिंदे, मनीषा यादव, शांताबाई म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते. संतोष राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले उपविभागीय अधिकारी स्वप्निल देशमुख यांनी आभार मानले. यावेळी जल प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed