नगरकीर्तन यात्रेने ‘हिंद-दी-चादर’ला प्रारंभ:‘बोले सो निहाल’चा जयघोष, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, नांदेडनगरीत लाखो भाविक दाखल




‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी सोहळ्यानिमित्त शनिवारी नांदेडनगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. ‘बोले सो निहाल… सत श्री अकाल’चा गगनभेदी जयघोष, आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह… अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात भव्य ‘नगरकीर्तन’ सोहळा पार पडला. असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात श्री गुरुग्रंथसाहिबांचे अत्यंत भक्तिमय व मंगल वातावरणात विधिवत विराजमान झाले. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दुपारी मुख्य कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. तत्पूर्वी त्यांनी ऐतिहासिक तखत सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबजी गुरुद्वारा येथे ‘बोले सो निहाल’च्या जयघोषात पवित्र गुरू ग्रंथसाहिबजीसमोर माथा टेकला. शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या बलिदानास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शनिवार व रविवार असे दोन दिवस ‘हिंद-दी-चादर’ सोहळा भव्य दिव्य स्वरूपात होत आहे. या ऐतिहासिक नगरकीर्तनाला (दि. २४) सकाळी ८ वाजता तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबजी येथून प्रारंभ झाला. चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शहिदी कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा शिबिराचा नागरिक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. या शिबिरात पहिल्या दिवशी भाविकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तसेच औषधे, काठ्या, कृत्रिम अवयव व चष्म्यांचे वाटप करण्यात येत असून हजारो नागरिक या सुविधांचा लाभ घेत आहेत. या शिबिरात श्री गुरुग्रंथसाहिब सेवा संस्थेच्या गुरू का लंगर डोळ्याचा दवाखानाच्या वतीने भरीव सहभाग देऊन योगदान देत आहेत. या शिबिराचा सुमारे साडेपचार हजार जणांनी लाभ घेतला. श्री गुरुग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम, लंगरची व्यवस्था आयोजकांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांचे सहकार्य मिळत आहे. भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे. श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांचा त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहिदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे. श्री गुरुग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांनी महासागरासारखी गर्दी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून ४ किमीपर्यंत स्वागत गेट क्रमांक १ ते मोदी मैदान या अंदाजे चार किलोमीटरच्या मार्गावर एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरुग्रंथसाहिबजींचे दर्शन घेतले. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक ‘गतका’ प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती, तर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘लेझीम’ नृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात ‘मानवता की सच्ची मिसाल’ आणि ‘हिंद-दी-चादर’ असे फलक घेऊन सामाजिक संदेशही या वेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *