शिवसेना ठाकरे पक्षाकडून पुण्यात संघटनात्मक फेरबदल:वसंत मोरे पुणे शिवसेना शहराध्यक्षपदी, पिंपरी-चिंचवड प्रमुखपदी चेतन पवार यांची निवड

0
b6689436-7547-4cb0-815a-2c89ca0aea29_1777534320112.jpg




पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पुणे शहराध्यक्षपदी वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची धुरा चेतन पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने शिवसेना (उबाठा) ने यापूर्वी पुण्याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्यासाठी हे बदल आवश्यक मानले जात होते. नुकत्याच झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. मनसे आणि काँग्रेससोबत युती करून पक्षाने ६५ ते ७० जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला, ज्यात स्वतः वसंत मोरे यांचाही समावेश होता. या निकालानंतर पक्षात मरगळ आल्याचे चित्र होते. पक्षाची संघटनात्मक बांधणी पुन्हा मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘भाकरी फिरवण्याचा’ निर्णय घेतला. बुधवारी खासदार संजय राऊत यांनी पुणे दौरा करून स्थानिक नेत्यांशी चर्चा केली होती, त्यानंतर गुरुवारी वसंत मोरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. वसंत मोरे यांनी २०२४ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पुण्याच्या स्थानिक प्रश्नांची जाण असलेला आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा आहे. शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मोरे म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला मी पूर्णपणे न्याय देईन. पुण्यात शिवसेना पुन्हा एकदा शून्यातून उभी करून दाखवू आणि येणाऱ्या काळात महापालिकेत भगवा फडकवू.” केवळ शहराध्यक्षच नव्हे, तर प्रभाग आणि विभाग स्तरावरही अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांना मार्गदर्शक भूमिकेत ठेवून, तरुण रक्ताला संघटनेत स्थान देण्यात आले आहे. या बदलांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) पुण्यात कशा प्रकारे उभारी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed