अभिजात मराठीचा आविष्कार सुलेखनातून व्हावा:अभिजात मराठीचा आविष्कार सुलेखनातून व्हावा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचे आवाहन
![]()
श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड आणि अक्षर रसिक सुलेखन वर्ग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुलेखन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पुणे येथील भावे स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर रामदासी वाङ्मयाच्या संशोधिका-लेखिका मनीषा बाठे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. दासबोध जयंतीनिमित्त सज्जनगड संप्रदाय अधिकारी सु. ग. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश जोशी यांनी या सुलेखन स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. या स्पर्धेत ३४ शाळांमधील २० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात स्पर्धेतील विजेते विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि सहभागी शाळांना गौरविण्यात आले. शैलेश जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर पल्लवी जोशी यांनी आभार मानले. मनीषा बाठे यांनी रामदासी परंपरेतील विचारांचे महत्त्व आणि तरुण पिढीने या परंपरेशी जोडले जाण्याची गरज अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, ‘समर्थ रामदास यांनी सुंदर व शुद्ध लेखन पद्धतींचा विचार मांडला आहे. त्यांनी सांप्रदायाच्या ज्ञानमार्गी रचनेत भारतातील अनेक पंथ, सांप्रदायिकांच्या ग्रंथाभ्यासाचा पायंडा घालून दिला आहे.’ त्या पुढे म्हणाल्या की, ‘आज रामदासी दफ्तरात दासबोधाच्या बरोबरीने ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, जगद्गुरू तुकारामांची गाथा आणि अनेक वारकरी संतांच्या अभंगांचा साठा आढळतो. समर्थांच्या त्या ज्ञानोपासक साक्षेपी संघटनाचा प्रत्यय आजही आठ राज्यांतून १३५ मठांतून येतो. या योगदानाचा उपयोग करून आता समर्थांच्या ज्ञानोपासक चळवळीचे सामर्थ्य दाखविण्याची आज गरज आहे.’ प्रमुख पाहुणे योगेश सोमण यांनी सुलेखन स्पर्धा उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘चांगले हस्ताक्षर हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. त्यासाठी परिश्रम केले पाहिजेत. आपल्या कारकिर्दीत चांगल्या अक्षराचा फायदाच होतो. चांगल्या हस्ताक्षरातून व्यक्त व्हायला शिकले पाहिजे. अभिजात मराठीचा आविष्कार सुलेखनातून व्यक्त झाला पाहिजे. सुलेखनाचा सराव करून त्यात प्रगत आणि उन्नत झाले पाहिजे.’ कार्यक्रमाला श्री रामदास स्वामी संस्थानचे प्रतिनिधी कौस्तुभ जोशी, मधुरा वाघ, मृणाल ब्रह्मे, योगिनी गोखले यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
