देगलूर येथील अंध बौद्ध विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची एसआयटी चौकशी करा

रिपब्लिकन सेनेची मुख्यमंत्रीांकडे मागणी; १५ दिवसांत चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

 

नांदेड : देगलूर येथील सुगत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अंध निवासी शाळेतील अंध बौद्ध विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू तसेच लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करून चौकशी करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

 

निवेदनात तत्कालीन मुख्याध्यापक मारुती वेंकटराव शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांना बिलोली अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाल्याचा उल्लेख आहे. तसेच पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता आरोपीला मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शिंदे यांना उपचाराच्या कारणास्तव हैदराबाद येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

 

शिंदे यांनी मागील चार वर्षांत अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्या कथित संपत्तीबाबतही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जामिनावर बाहेर आल्यानंतर शिंदे यांनी शाळेत येऊन मुख्याध्यापिका ज्योती अपुलवार यांना धमकावल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

 

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करावी, अशी मागणी करण्यात आली. पंधरा दिवसांत चौकशी समिती गठीत न झाल्यास नांदेड शहरात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रिपब्लिकन सेनेने दिला आहे.

 

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे, एस. पी. वाघमारे, प्रा. साहेबराव बेळे, प्रेम व्यवहारे, फैजल शेख, व्यंकटी पवार, गंगाधर पाईकराव, विशाल राऊत, शेख सलीम, अमोल सितळे, शेख जावेद, आकाश लाटकर, सुकेशनी बुक्तरे, शेख सलीम नेरलीकर, रेखाताई ढवळे, राधाताई कासले कमलताई पाटील वैशालीताई पंडितआदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *