लॉकअपमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पत्रकाराची बदनामी केल्याचा आरोप

अर्धापूर पोलीस ठाण्यात NCR दाखल; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी;चौकशी पोलीस उप अधिक्षक माणिक बेद्रे यांच्याकडे 

नांदेड  (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अदखलपात्र गुन्ह्याच्या (NCR) अनुषंगाने पोलीस कोठडीत असतानाचा आपला फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्यात आल्याचा आरोप एका पत्रकाराने केला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात NCR दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षकशहाजी उमाप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी अर्धापूर परिसरात ही घटना घडली. जावेद कुरेशी, शेख किंग आणि अब्दुल रहीमान यांच्यासह काही व्यक्तींनी संगनमत करून फेसबुकवर आपला लज्जास्पद फोटो प्रसारित करून सार्वजनिक बदनामी केल्याचा आरोप अर्जदार अब्दुल सोहेल, रा. अर्धापूर, जि. नांदेड यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला फोटो हा अर्जदार पूर्वीच्या एका प्रकरणात पोलीस कोठडीतील लॉकअपमध्ये असतानाचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील लॉकअपमधील हा खासगी फोटो संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचला कसा, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

फोटोसोबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून बदनामी करण्यात आली तसेच सोशल मीडिया कमेंट्सद्वारे मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा, गोपनीयता आणि मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे अर्जदाराने म्हटले आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात NCR दाखल करण्यात आला असून, त्याची प्रत तसेच फेसबुकवरील पोस्टचा स्क्रीनशॉट निवेदनासोबत जोडण्यात आला आहे.या अर्जाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस उप अधीक्षक माणिक बेद्रे यांना दिले आहेत. दरम्यान, लॉकअपमधील फोटो बाहेर कसा गेला, तो कोणी उपलब्ध करून दिला आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यामागे कोणाचा सहभाग आहे, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जदाराने नांदेड परिक्षेत्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.


Post Views: 518










Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *