![]()
पुणे येथे झालेल्या बजाज पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेचा शुक्रवारी समारोप झाला. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. न्यूझीलंडचा सायकलपटू मडग्वे लूक याने प्रतिष्ठेची येलो जर्सी पटकावली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात बल्गेरियाच्या श्रींको अलियस्कीने सुवर्णपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट कॅमेरॉनने रौप्यपदक मिळवले. मडग्वे लूकने संपूर्ण शर्यत ९ तास ३३ मिनिटे ४ सेकंदात पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाचा सायकलपटू बीटल्स कार्टर अवघ्या दहा सेकंदांच्या फरकाने उपविजेता ठरला. भारतीय गटात हर्ष वीर सिंग सेखोय ब्ल्यू जर्सीचा मानकरी ठरला, तर मानव सरदा दुसऱ्या स्थानी राहिला. गेले पाच दिवस ही स्पर्धा पुण्यात सुरू होती. ४३७ किलोमीटरच्या या स्पर्धेत पुणे सिटी प्रोलोग, मराठा हेरिटेज सर्किट, सह्याद्री हील स्टेज आणि पुणे प्राइड लूप असे टप्पे होते. पुणे जिल्ह्यातील सह्याद्री घाट, वाड्या-वस्त्यांतील वळणे, पुरंदर आणि सिंहगड गडांवरील चढाई अशा खडतर मार्गांवरून ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला अभिनेता आमिर खान, केंद्रीय क्रीडा व युवा खात्याच्या राज्यमंत्री रक्षा खडसे, युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलच्या संचालिका अमिना लनाया, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार आणि पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमिर खान म्हणाला, पुणे शहराने एक चांगला कार्यक्रम आयोजित करून देशाची मान उंचावली आहे. प्रशासनाने आणि पुणेकर यांनी योग्यप्रकारे नियोजन केले आहे. पुढील वर्षी आणखी चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात येईल. खडसे म्हणल्या, देशात अशाप्रकारे प्रथम स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे . देश हे क्रीडा संस्कृतीकडे पुन्हा एकदा वाटचाल करत आहे. क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात देश एक प्रमुख ठिकाण म्हणून नावारूपास येत आहे.
न्यूझीलंडचा मडग्वे लूक येलो जर्सीचा मानकरी:बजाज पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धा; बल्गेरियाचा अलियस्कीने अंतिम टप्पा जिंकला
