अमरावतीत आजपासून महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू:विदर्भातील 15 संघ सहभागी; महाअंतिम फेरीसाठी निवड

0
7fc945f5-36c6-4ed0-a73a-9e5e47f1fd63_1769098565443.jpg




राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अमरावती येथे आजपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या (पीडीएमसी) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विदर्भासाठी हे एकमेव केंद्र असल्याने अमरावती आणि नागपूर विभागातील एकूण १५ महाविद्यालयांचे संघ यात सहभागी झाले आहेत. या प्राथमिक फेरीच्या स्पर्धेतून ५ उत्कृष्ट संघांची महाअंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. अशाप्रकारे, चारही विभागांतून एकूण २० संघ अंतिम टप्प्यात पोहोचतील. मराठी रंगभूमीतील नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणे, एकांकिका चळवळीला नवसंजीवनी देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा समृद्ध करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. प्राथमिक फेरी नि:शुल्क ठेवण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त नाट्यसंघांनी यात सहभागी व्हावे. ही एकांकिका स्पर्धा केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून, विदर्भासह पुणे, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रमुख विभागांमध्ये प्राथमिक फेरीच्या स्वरूपात घेतली जात आहे. यामुळे राज्यभरातील नाट्यसंघांना एक सुवर्णसंधी मिळाली आहे. या स्पर्धेतून मराठी एकांकिका चळवळीत नवा इतिहास घडेल अशी अपेक्षा आहे. स्पर्धा संयोजक विशाल फाटे आणि मराठी नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी अमरावतीकर नाट्यरसिकांना या एकांकिकांना प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. प्रौढांच्या नाटकांच्या प्राथमिक फेरीचे यशस्वी आयोजन झाल्यानंतर आता त्याच सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एकांकिका स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांनंतर येत्या काळात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धाही अमरावतीतच होणार आहेत. यासाठी अ.भा. नाट्य परिषदेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे आणि जिल्हाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे दावा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed