विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे:गुरुकुंज मोझरी व शिवणगाव येथे कार्यशाळा आयोजित




शाळा सुरक्षा कृती कार्यक्रमांतर्गत गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव विद्यामंदिर आणि शिवणगाव येथील शिवचंद्रजी लढ्ढा माध्यमिक शाळेत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने ही कार्यशाळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आली. या कार्यशाळेत शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तिवसा येथील तहसीलदार डॉ. मयूर कळसे आणि नायब तहसीलदार आशिष नागरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आपत्ती, त्यादरम्यान घ्यावयाची काळजी आणि योग्य व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन केले. संदीप दाहाट यांनी आपत्ती व्यवस्थापनासंबंधी माहिती दिली, तर वैभव तांबे आणि युवक पाचघरे यांनी विविध आपत्तींची सविस्तर माहिती सांगितली. किशोर गोरडे आणि प्रियंका मेश्राम यांनी प्रथमोपचाराबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापन पथकाने यावेळी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अनपेक्षित आपत्तीच्या वेळी अडकलेल्या व्यक्तींची सुटका कशी करावी आणि स्वतःचा व इतरांचा बचाव कसा करावा, याचे प्रभावी प्रदर्शन केले. शालेय जीवनात उद्भवणाऱ्या आकस्मिक आपत्तींचे नियोजन कसे करावे, यावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिलेल्या उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *