![]()
मराठी शाळा टिकल्या तरच महाराष्ट्र राज्य मराठी परीक्षा मंडळ टिकेल आणि पर्यायाने मराठी संस्कृती कायम राहील, असे प्रतिपादन अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप संगवे यांनी केले. मराठी विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी खाजगी अनुदानित मराठी शाळांनी आपला दर्जा टिकवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्थानिक सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित मुख्याध्यापकांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. अमरावती विभागीय परीक्षा मंडळ आणि जिल्हा शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालक निलिमा टाके-गुल्हाने, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, सिपना शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक निलेश गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संगवे यांनी पुढे सांगितले की, श्रीमंतांची मुले पंचतारांकित शाळांमध्ये शिकून परदेशात जातील, पण सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांची मुले इथेच राहतील. हीच मुले देशाचे भविष्य घडवणार आहेत आणि त्यांना सक्षम बनवणे आपली जबाबदारी आहे. स्वयंशासित शाळांचे शुल्क पालकांना परवडणारे नसल्याने या मुलांना आपल्या शाळांशिवाय पर्याय नाही. आपल्या उदासीनतेमुळे शाळा कोलमडल्यास ही मुले कुठे शिकतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या मुलांचे आणि पर्यायाने देशाचे भवितव्य जपायचे असेल, तसेच मराठी संस्कृती टिकवायची असेल, तर प्रत्येकाने आपल्या जबाबदारीत जीव ओतला पाहिजे, असे आग्रही मत संगवे यांनी व्यक्त केले. शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी शिक्षकांना समाजातील महत्त्वाचा घटक मानून सुशिक्षित व सुसंस्कृत पिढ्या घडवण्याची जबाबदारी त्यांची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी अपघात सानुग्रह योजनेतील निधी शासनाने वाढवला असून, अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यास ७५ हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकेल, अशी माहितीही देशमुख यांनी दिली. कार्यशाळेचे संचालन व आभारप्रदर्शन संत कंवरराम शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू अडवाणी यांनी केले.
मराठी शाळा वाचल्यास मराठी संस्कृती टिकेल:शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संगवे यांचे मुख्याध्यापक कार्यशाळेत प्रतिपादन
