मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होणार:मित्रपक्षांचे दबावतंत्र धुडकावत सत्तेची तयारी सुरू, दिल्लीतील बैठकीत मुहूर्त ठरला




देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या सत्तेचा सस्पेन्स आता संपला असून, भारतीय जनता पक्षाने आपला ‘राज्याभिषेक’ करण्याचा मुहूर्त निश्चित केला आहे. येत्या ३० जानेवारीला मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर कारभाराची सूत्रे हाहात घेणार असल्याची खात्रीशीर माहिती दिल्लीतील सूत्रांकडून मिळत आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दशकांपासूनची मुंबईवर सत्ता गाजवण्याची भाजपची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंगळवारी (२१ जानेवारी) अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आहे. या सोहळ्यासाठी मुंबई आणि राज्यातील भाजपचे दिग्गज नेते सध्या दिल्लीत पोहोचले आहेत. याच नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंबईच्या महापौरपदाबाबत अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. नितीन नबीन यांच्या कार्यकाळाची सुरुवात मुंबईसारख्या प्रतिष्ठेच्या महापालिकेवरील विजयाने व्हावी, अशी रणनीती पक्षश्रेष्ठींनी आखली आहे. “मुंबईच्या महापौरपदासाठी पक्षाने खूप वाट पाहिली आहे, आता कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश दिल्लीहून देवेंद्र फडणवीस यांना आधीच देण्यात आला होता. मित्रपक्षांना योग्य त्या सन्मानाने सोबत घ्या, पण महापौरपदावर दावा सोडू नका, असे कडक निर्देश हायकमांडने दिले होते. ३० जानेवारीला ऐतिहासिक ‘राज्यारोहण’ दिल्लीतील भाजप नेत्यांच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी रोजी भाजप आपला महापौर बसवून मुंबई महापालिकेच्या इतिहासात नवे पर्व सुरू करणार आहे. या दिवशी केवळ महापौरच नव्हे, तर गटनेत्यांची निवड आणि इतर वैधानिक समित्यांबाबतही भाजप आपले वर्चस्व सिद्ध करेल. संख्याबळाचे गणित आणि महायुतीचा पेच मुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमताचा ११४ हा आकडा गाठण्यासाठी भाजपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या २९ नगरसेवकांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण ११८ नगरसेवक होत असल्याने महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. परंतु, हीच संधी साधून शिंदे गटाने भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे पहिल्या अडीच वर्षांसाठी मुंबईचे महापौरपद आणि पालिकेच्या तिजोरीची चावी मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’सह ‘बेस्ट समिती’त मोठा वाटा मागितला होता. मात्र, भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने हे ‘प्रेशर पॉलिटिक्स’ पूर्णपणे झिडकारल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *