बसस्थानकावर 'नाथजल' महाग विकल्यास परवाना रद्द:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना इशारा, 40 रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना
![]()
लोणावळा बसस्थानकावर प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांनाच मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्री सरनाईक यांनी गुरुवारी सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास भेट देऊन प्रवासी सेवा-सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला असता, बसस्थानकावर ‘नाथजल’ची एक लिटरची थंड पाण्याची बाटली २० रुपयांना विकली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित विक्रेत्यास स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच, १५ रुपयांची बाटली अधिक दराने विक्री केल्यास विक्री परवाना रद्द करण्याचा इशाराही दिला. यावेळी प्रवाशांनी लोणावळा बसस्थानकात न येता काही बसफेऱ्या पुढे जात असल्याची, तसेच जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबत असल्याची तक्रार केली. हॉटेलांवरील महागडे खाद्यपदार्थ प्रवाशांना परवडत नसल्यामुळे, सर्व बसफेऱ्या नाश्त्यासाठी लोणावळा बसस्थानकावरच थांबाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली. यावर मंत्री सरनाईक यांनी कोणतीही बस खाजगी हॉटेलांवर न थांबता नियोजित वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावरच थांबावी, असे स्पष्ट निर्देश एसटी प्रशासनाला दिले. या पाहणीदरम्यान त्यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, तिकीट व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयींचा सविस्तर आढावा घेतला. प्रवाशांना अधिक दर्जेदार व सुलभ सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी कर्मचाऱ्यांशी व प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, महामार्गांवरील हॉटेल्सप्रमाणेच एसटी बसस्थानकांवरील उपहारगृहांमध्येही सर्व प्रवाशांना ४० रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना १ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या पाहणीदरम्यान खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच एसटीचे अधिकारी उपस्थित होते. चालक-वाहक हा एसटीचा कणा असून, त्यांना कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर घरच्यासारख्या सुविधा मिळाल्यास ते अधिक उत्साहाने सेवा बजावतील, असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.
