ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणूक:शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी गंडा घातला




पुणे येथे एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २२ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली असून, या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ८८ वर्षांचे असून, ते मूळचे गुरुग्रामचे रहिवासी आहेत. सध्या ते मगरपट्टा सिटी परिसरात कुटुंबासोबत राहतात. त्यांचे मुलगा आणि सून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. तक्रारदारांचा हडपसरमधील औद्योगिक वसाहतीत एक छोटा कारखाना होता. कोरोना काळात त्यांनी हा कारखाना विकला होता, ज्यामुळे त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी वेळेत चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. सुरुवातीला त्यांनी चोरट्यांच्या खात्यात काही रक्कम गुंतवली. चोरट्यांनी सुरुवातीला तक्रारदारांच्या खात्यात काही रक्कम जमा करून त्यांना परतावा मिळाल्याचे भासवले. यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन झाला, मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी वेळोवेळी चोरट्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण २२ कोटी तीन लाख २२ हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधणे टाळले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *