'लाडकी बहिण' योजनेचे 300 महिलांचे पैसे रखडले:नांदगावच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले




नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तीनशेहून अधिक महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे गेल्या तीन महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत. याविरोधात त्यांनी सोमवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी आंदोलक महिलांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांनी केले. चर्चेदरम्यान, केवायसी (KYC) करताना चुकीची माहिती भरली गेल्याने या महिलांचे पैसे रखडले असल्याचे समोर आले. यासंदर्भात महिलांनी यापूर्वी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नव्हती. यावर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी पुढाकार घेत महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी संबंधित महिलांना माहिती दिली की, केवायसीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी संबंधित पोर्टल पुन्हा सुरू करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर चुकांची दुरुस्ती झाल्यास संबंधित महिलांना त्यांचे लाभ पूर्ववत मिळतील. या आंदोलनात वंदना भोवते, उषा गायधनी, वनमाला मांगुलकर, शिला मोहतुरे, रेखा इंगळे, सुजाता सावळे, अर्चना गायधनी, स्वामिनी सरकटे, विमल सावळे, बेबी साबळे, किरण इंगळे, बेबी कंटाळे, विमल खवले, मनकर्णा गोळे, सीमा पवार, छाया भालेराव, ज्योती साबळे, आरती सावळे, पूनम घुले आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *