![]()
जर पवार फॅमिली महाराष्ट्रात कुठेही जाऊन उभे राहत असेल तर मी कुठेही उभे राहू शकतो. बारामतीच्या जनतेने आग्रह केल्यास बारामती विधानसभा निवडणूक लढणार, असे विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे बोलले जात असतानाच लक्ष्मण हाके यांनी पवारांच्या विरोधात बारामती विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, गेले कित्येक वर्ष बारामतीतली सत्ता पवारांच्या हातात असताना देखील तालुक्याच्या जिरायती भागात अद्याप देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील त्यांना सोडवता आला नाही. पवारांना आता सर्व लोकांनी ओळखलेय त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड सह सर्व महानगरपालिकातून पवार जवळपास सत्तेबाहेर झालेत. अजित पवार पहाटे उठून पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि बारामती मध्येच का जातात बाकी कडे का जात नाहीत, असा सवाल हाके यांनी केला आहे. पवारांना पुणेकरांनी कात्रजचा घाट दाखवला तसेच अजित पवार पहाटे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सांगली महापालिकेत, परभणीच्या महापालिकेत, चंद्रपूरच्या महापालिकेत पहाटे जाऊन विकास विकास बघितला आहे का? असाही प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका यांनीई जहागीर समजली होती, त्या लोकांनी यांना कात्रजचा घाट दाखवला, अशी टीका हाके यांनी केली. ठाकरेंनी महाराष्ट्राची अब्रू वाचवली पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, ठाकरेंनी महाराष्ट्राची अब्रू वाचवली. माझे आणि त्यांचे लई जमते म्हणून नाही बोलत, ठाकरेंना जनतेने दाद दिली. संघर्ष करणाऱ्या लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस आहे, हे मुंबईच्या जनतेने दाखवले. तुम्ही (पवार) एकदा भाजपच्या बाजूला, एकदा याच्या बाजूला, एकदा त्याच्या बाजूला, काय चालले नक्की, म्हणून पवार कुटुंबावर बोलतो, असे हाके म्हणाले. भाजपच्या नेत्यांना आता उतरती कळा लागली आहे, मूळचे नेते बाजूला राहिले असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच प्रकाश शेंडगे आणि काँग्रेस यांच्या युती बाबत चर्चेवर देखील त्यांनी निशाणा साधला. या निवडणुकीत ओबीसी बांधवांना सोबत घेऊन पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचे हाके यांनी म्हटले. राजकारण करायला आमच्याकडे कारखाना नाही बारामतीच्या दुष्काळी भागात 25 ते 30 गावे आहेत, त्या गावातील जनतेला पिण्याचे पाणी मिळू शकत नाही, हे पाहायला येतोय. बारामतीचा विकास पाहायला बारामतीला येतो, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. आम्ही सामाजिक आंदोलन करणारी माणसं आहोत, राजकारण करायला आमच्याकडे कारखाना नाही. आमच्याकडे पार्थ पवारांप्रमाणे दारुची फॅक्टरी नाही. आमच्याकडे दादांप्रमाणे अर्थखाते नाही. सर्वसामान्यांचा आवाज बनणे हे आंदोलक म्हणून आमचे काम आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, पवार सत्तेत आहेत, म्हणून त्यांच्या विरोधात बोलत आहे. राज्यसभेची सीट देखील तुम्हाला पाहिजे, जिल्हा परिषदेला युगेंद्र पवारांना उभे करणार असल्याचे ऐकलेय. महाराष्ट्रातील 10 गेल्या तरी चालतील यांना अडवले पाहिजे. लोकशाही इथल्या लोकांना कळली नाही. आम्ही फक्त मतदान द्यायला जन्म घेतलाय, एवढीच लोकशाही लोकांना कळालीय, असे हाके म्हणाले. तुम्ही सत्तेत आहात की विरोधात आहात हे एकदा पवारांनी महाराष्ट्राला सांगावे. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा नेता व्हायचे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भाजपबरोबर जाऊन हजारो कोटींची, लाखो कोटींची डील, आपली प्रकरणे यासाठी कॉम्प्रमाईज करायचे आहे. यांची थेट डील अमित शाह, नरेंद्र मोदींसोबत असते, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
पवारांना पुणेकरांनी 'कात्रजचा घाट' दाखवला:लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका; पवारांच्या विरोधात 'बारामती विकास आघाडी'ची घोषणा
