'लाईट बंद करण्याची परमिशन कुणी दिली?':जाब विचारत वीज कर्मचाऱ्याची पकडली कॉलर; गेवराई गावात राडा, दोघांवर गुन्हा दाखल




महावितरणच्या एरिअल बंच केबलचे काम करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार गेवराई गावात घडला आहे. ‘लाईट का बंद केली?’ असा जाब विचारत कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत तारांचे काम करताना धक्काबुक्की महावितरणच्या वाळूज महानगर ग्रामीण शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ संजय चव्हाण, तंत्रज्ञ जितेंद्र राठोड आणि योगेश कणके हे मंगळवारी (१४ जुलै) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेवराई गावात एरिअल बंच केबलचे काम करण्यासाठी गेले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांनी पाडळकर, बगडीया आणि दर्डा या तिन्ही डीपींचा (रोहित्र) वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास उत्तम बाबू चव्हाण याच्या घरासमोर तारांचे काम सुरू असताना, त्याने तंत्रज्ञ जितेंद्र राठोड यांना विनाकारण शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. ‘लाईट का बंद केली?’ म्हणत अर्वाच्य शिवीगाळ पहिल्या वादानंतर कर्मचाऱ्यांनी तिथले काम तसेच ठेवले आणि दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान ते गावातील मुख्य रस्त्यावरील तारांचे काम करू लागले. याचवेळी सतीश विष्णू शिंदे नावाचा व्यक्ती तिथे आला. ‘लाईट का बंद केली? लाईट बंद करायची परमिशन तू घेतली आहे का? काम त्वरित बंद करा,’ अशी दादागिरी करत त्याने कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. संतापलेल्या सतीशने जितेंद्र राठोड यांच्या शर्टाची कॉलर धरली आणि झटापटीत त्यांच्या खांद्यावरील बक्कलचे बटन तोडले. तसेच त्याने तंत्रज्ञ योगेश कणके यांनाही शिवीगाळ केली. चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे महावितरणचे कर्मचारी चांगलेच हादरले. या घटनेनंतर वरिष्ठ तंत्रज्ञ संजय चव्हाण यांनी थेट चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सतीश विष्णू शिंदे आणि उत्तम बाबू चव्हाण या दोघांविरुद्ध मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हेही वाचा.. इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण: 9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सविस्तर वाचा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *