निकृष्ट बियाणे विक्रीवर कृषी विभागाची कारवाई:हिंगोलीत 385 पैकी 34 नमुने फेल, 175 बॅगच्या विक्रीला स्थगिती




शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागामार्फत हिंगोली जिल्ह्यात बियाणे कंपन्यांच्या बियाण्यांची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत ३८५ पैकी ३४ नमुने अप्रमाणित आढळून आले आहे. चालू वर्षात मे ते जुलै या कालावधीत विविध बियाणे कंपन्यांचे एकूण 385 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये मे महिन्यात 34, जूनमध्ये 339 आणि जुलैमध्ये 12 नमुन्यांचा समावेश आहे. घेतलेल्या 385 नमुन्यांपैकी 34 नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. ईगल सीडस, जेएस सीडस, रवी सीडस, पार्श्व जेनेटीक्स, बुस्टर प्लांट जेनेटीक्स, दफ्तरी अ‍ॅग्रो प्रा.लि., ऑस्कर सीडस, विगर बायोटेक, इनोव्हेज अ‍ॅग्रो, एशियन सीडस, श्री ओस्तवाल सीडस, शिवसागरमोती सीडस, ग्रीन गोल्ड सीडस, अंकुर सीडस, निर्मल सीडस, बन्सल सीडस, स्नेहा अ‍ॅग्रोटेक, युर्लींक सीडस आणि सहर्ष सीडस या कंपन्यांचे नमुने तपासणीत अप्रमाणित आढळून आले आहे. याअप्रमाणित आढळलेल्या 34 प्रकरणांपैकी 7 प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित 27 प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. याशिवाय नियमभंग करणाऱ्या बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करत 175 बॅग बियाण्यांच्या विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात सोयाबिन हे प्रमुख पीक आहे. आतापर्यंत 2 लाख 41 हजार 813 हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबिनच्या उगवणीबाबत शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या 16 तक्रारींपैकी 11 तक्रारींची तालुका तक्रार निवारण समितीमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून निकाली काढण्यात आली आहे. उर्वरित तक्रारींची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, खरेदीची पावती जतन करावी आणि निकृष्ट बियाणे आढळल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. त्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकणार : जिल्हाधिकारी राहूल गुप्ता हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षात सतत अप्रमाणित नमुने आढळून आलेल्या बियाणे कंपन्यांची माहिती मागविण्यात आली असून या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे. याशिवाय बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत लवकरच बैठक घेतली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *