![]()
राज्यात अनेक महानगरपालिकांमध्ये भाजप महायुतीने मुसंडी मारली असली, तरी मराठवाड्यातील परभणीत मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तब्बल १९ वर्षांनंतर परभणी महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, या विजयानंतर खासदार संजय जाधव यांनी भाजपवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. “भाजपने एका मताला १५ हजार रुपये वाटले, तरीही जनतेने त्यांना नाकारले,” असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महानगरपालिका निवडणूक निकालानंतर परभणीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तसेच काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी खासदार संजय जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. नेमके काय म्हणाले संजय जाधव? नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना संजय जाधव आक्रमक झाले होते. ते म्हणाले, “परभणीत पालकमंत्र्यांनी पैसा, सत्ता आणि सरकारी अधिकाऱ्यांचा प्रचंड गैरवापर केला. मताला १५ हजार रुपये वाटण्यात आले. मात्र, सत्तेची मस्ती असलेल्या पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवारही निवडून आणता आला नाही. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.” भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची अवस्था पाहून संजय जाधव यांनी हळहळ व्यक्त केली. “ज्यांच्याकडे पैसा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना पक्षात घेऊन निवडणुका लढवण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांनी आता फक्त सतरंज्याच उचलायच्या का?” असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरेंना घातली भावनिक साद दरम्यान, संजय जाधव यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना मोगल-इंग्रजांचा दाखला देत खचून न जाता लढण्याचे आवाहन करत, भावनिक साद घातली. ते म्हणाले, “‘या देशावर मोगलांनी आणि इंग्रजांनीही दीर्घकाळ राज्य केलं, पण त्यांचंही साम्राज्य एक दिवस संपलं. भाजपचीही एक्सपायरी डेट आता लवकरच जवळ येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खचून न जाता ठामपणे लढा सुरू ठेवावा.’’ १९ वर्षांनंतर सत्तांतर; काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला २०११ मध्ये परभणी महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून येथे प्रथम राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेसची सत्ता होती. २००७ मध्ये नगर परिषद असताना शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला होता. त्यानंतर तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ६५ जागांपैकी २५ जागा जिंकत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ही निवडणूक खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पहिल्यांदाच एकत्र येत लढवली असून, या युतीमुळे निवडणुकीला विशेष रंगत आली होती. निकालाने ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढवला असून, मराठवाड्यातील राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचं चित्र आहे.
भाजपने मताला 15 हजार वाटूनही उमेदवार पडले:संजय जाधव यांचा खळबळजनक दावा, म्हणाले – सत्ता अन् पैशाची मस्ती जिरली
