![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर पुणेकरांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून, हा जनादेश आनंददायी असला तरी मोठी जबाबदारी आहे, असे फडणवीस म्हणाले. पुणे महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका ठरावी यासाठी प्रामाणिक आणि पारदर्शी कारभार करण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य शासन पुणे महापालिकेच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही फडणवीस यांनी ‘भावी नगरसेवक’ असे संबोधून त्यांचे मनोबल वाढवले. फडणवीस म्हणाले की, “पुण्यात आपण इतिहास रचला असून, त्याचे तुम्ही सर्व शिल्पकार आहात.” गेल्या ३०-३५ वर्षांत पुणे महापालिकेत इतके मोठे बहुमत कोणीही मिळवले नव्हते. पुण्यातील लढत चुरशीची होईल अशी चर्चा होती, पण पुणेकरांनी ती एकतर्फी ठरवली. हा जनादेश जबाबदारीची जाणीव करून देतो. जनतेचा विश्वास सार्थ केल्यास पुढील पंचवीस वर्षे आपल्याला कोणीही हटवू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी विजयानंतर लगेच पुढील पाच वर्षांचे नियोजन करतात, त्याचप्रमाणे आपल्यालाही पुढील पाच वर्षांच्या विकासकामांचे नियोजन करायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुण्यासाठी मांडलेल्या विकास योजनांमुळे पुणेकर आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. नियोजित केलेल्या योजनांचे प्रत्यक्ष काम दोन वर्षांत सुरू होईल, असे नियोजन करून काम करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. पुणे महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी झपाटून काम करावे. “महापालिका हा सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा उपक्रम आहे, आपला व्यवसाय किंवा कमिशनचा धंदा नाही,” असे स्पष्ट करत फडणवीस यांनी कठोर शब्दांत सांगितले. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला तरी, कोणाचाही उन्माद किंवा गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पुणेकरांनी विकासाच्या अजेंड्यावर पुन्हा पसंतीची मोहोर उमटवली:पारदर्शी कारभार करत पुणे सर्वोत्तम पालिका बनवा – मुख्यमंत्री फडणवीस
