Nashik Municipal Election Raj Thackeray MNS Shiv Sena Appeal Criticism | राज ठाकरेंचे नाशिककरांना भावनिक आवाहन: म्हणाले- 1500 रुपयांसाठी आई-वडील विकले गेले, असे मुलांना वाटू देऊ नका – Nashik News



भविष्यात तुमच्या मुलांना पश्चाताप होऊ नये, 1500 रुपयांसाठी आपले आई-वडील विकले गेले असे म्हणू नये अशी जर इच्छा असेल शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत बोलताना केले आहे. यावेळी रा

.

नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी नाशिकला दत्तक घेतो असं सांगितलं. त्यांच्या सांगण्याला नाशिककर भुलले आणि आम्ही सत्तेत असताना केलेली कामे विसरली. दत्तक घेणारे फडणवीस नंतर पुन्हा आलेच नाहीत. 2012 साली आमची सत्ता असताना त्यावेळी कुंभमेळा झाला. त्याचे नियोजन उत्तम करण्यात आले. त्यासाठी एकही झाड कापले नाही. त्यावेळच्या नगरसेवकांचा, प्रशासकांचा सत्कार झाला. मग आता काय झाले? भाजपचे आगोदरच ठरते. कुंभमेळ्याच्या नावाखाली आता झाडे तोडायची, नंतर साधू परत गेल्यानंतर ती जागा उद्योगतपीच्या घशात घालायची. यांचे हे सगळे आधीच ठरलेले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

फडणवीसांनी एकही काम केले नाही

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, नाशिक नियो मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड, आदिवासी क्रीडा प्रबोधिनी असे अनेक प्रकल्प फडणवीसांनी जाहीर केले. पण एकही काम त्यांनी केले नाही. भाजपने फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली लोकांना भुलवले. 2017 साली आमची सत्ता गेली आणि भाजप निवडून आला. एवढे काम करूनही मला पराभव पाहायला लागला आणि ज्या लोकांनी काहीही केले नाही ते सत्तेत आले. आजही तेच सुरू आहे. पैसे वाटायचे आणि सत्ता मिळवायची हे काम सुरू आहे.

आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली

राज ठाकरे म्हणाले, नाशिकमध्ये आमची सत्ता असताना रतन टाटा यांच्या मदतीने आम्ही बोटॅनिकल गार्डन तयार केले होते. गेल्या पाच वर्षात यांनी त्याची काय अवस्था केली? नाशिकमध्ये आमची सत्ता असताना महापालिकेवर 700 कोटी कर्ज होते. पुढच्या पाच वर्षात आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली. पाच वर्षात विरोधकांकडूनही कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला नाही. मी कंत्राटदारांची बैठक घेतली होती. तुमच्याकडे जर कुणी पैसे मागितले तर सांगा, पण जर रस्त्यावर खड्डे पडले तर त्या खड्ड्यात उभा करून मारेन असे सांगितले होते. हे होऊ शकते, पण यांना आता करायचे नाही.

कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर

महाराष्ट्रात 60-70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यासाठी किती पैसा खर्च केला? कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इतके पैसे कुठून येतात? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, 1952 मध्ये स्थापन झालेल्या जनसंघाला 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते होते ना, मग बाहेरून का घेता? एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हे ठिक आहे, पण सगळीकडेच हे सुरू. त्यातून तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त कामंच करायची.

भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला

आमचा आई-बाप 1500 रुपयांसाठी विकले गेले, विकास झालाच नाही असे जर तुमच्या मुलांनी भविष्यात म्हणू नये असे वाटत असेल तर आम्हाला सत्ता द्या. आज आमच्या पाठिशी उभे राहा, भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला. हे शहर उत्तम करायचे असेल तर तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *