![]()
पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची कायदेशीर कारवाईची भीती दाखवून १७ लाख ४३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी त्यांच्या बँक खात्याचा वापर केल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस
.
सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास करत असल्याची बतावणी त्यांनी केली.
चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर दहशतवाद्यांनी केला असून, जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले. कायदेशीर कारवाईची आणि अटकेची भीती दाखवून त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला धमकावले.
अटक टाळण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा केली. परंतु आणखी पैशांची तक्रारदार यांना संशया आला त्यांनी खातरजमा केली असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा विविध घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
