![]()
आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर आणि सातारा जिल्ह्यात तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ने 9 हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करून दिले आहेत. या किटमुळे पोलिसांची गैरसोय टळणार असून, त्यांना वारकऱ्यांना अधिक चांगल्या सेवा देता येणार आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. यात कोलगेट पाऊच, टुथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, कापडी मास्क आणि पाणी बॉटल यांचा समावेश आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येतात. या सोहळ्याच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात केले जाते. 15 ते 19 जुलै या कालावधीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातून लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या मार्गाने मार्गक्रमण करते. या बंदोबस्तासाठी 2700 पुरुष पोलिस आणि 300 महिला पोलिस कर्मचारी तैनात असतात. सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाने यासाठी 3 हजार किटची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, 25 जुलै रोजी पंढरपुरात होणाऱ्या आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह राज्यभरातील शेकडो पालख्या आणि दिंड्या दाखल होतात. याशिवाय, वैयक्तिक पातळीवर येणाऱ्या भक्तांचीही मोठी संख्या असते. पंढरपूरमध्ये 6 हजार 500 पुरुष पोलिस आणि 2 हजार महिला पोलिस बंदोबस्तासाठी असतात. पंढरपूर उपविभागीय कार्यालयाने युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे अशाच प्रकारच्या किटची विनंती केली होती. पुनीत बालन यांनी तत्काळ प्रतिसाद देत हे किट उपलब्ध करून दिले. त्यानुसार, सोलापूर ग्रामीण पोलिस दलासाठी 7 हजार किट आणि सातारा ग्रामीण पोलिस दलासाठी 2 हजार किट असे एकूण 9 हजार किट वितरित करण्यात आले आहेत.
पुनीत बालन ग्रुपकडून वारीतील पोलिसांना 9 हजार किट:आषाढी वारी बंदोबस्तासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
