अभी नहीं तो कभी नहीं!: दिल्लीच्या ‘मालकां’विरोधात ठाकरे बंधू एकत्र; महापालिकांत रणशिंग फुंकले; संयुक्त मुलाखतीने राजकारण ढवळून निघाले – Mumbai News

महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ काळानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दशकांनंतर एकत्र मंचावर आले असून ‘सामना’साठी दिलेल्

.

या मुलाखतीच्या सुरुवातीलाच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागील कारणांवर चर्चा झाली. संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, भूतकाळातील मतभेद, वाद किंवा गैरसमज यावर आज चर्चा करण्याची वेळ नाही. महाराष्ट्र आणि मुंबईवर आलेले संकट हेच एकत्र येण्यामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. आज हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून संपूर्ण मराठी समाजाच्या अस्तित्वाचा आहे. जर या टप्प्यावर एकजूट झाली नाही, तर महाराष्ट्र आपल्याला कधीच माफ करणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांनीही याच भूमिकेला दुजोरा देत सांगितले की, दोन ठाकरे बंधू एकत्र येणे ही भावनिक बाब असली, तरी त्याचा खरा अर्थ म्हणजे संपूर्ण मराठी समाजाने एकत्र उभे राहणे. महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर पक्ष, विचारधारा आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठी माणसाने एकजूट दाखवली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र तोडण्याचे डाव रचणाऱ्यांना यश मिळेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देत राज ठाकरे यांनी सध्याची परिस्थिती तितकीच गंभीर असल्याचे सांगितले. त्यावेळी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे प्रयत्न झाले होते आणि आजही तेच कारस्थान नव्या स्वरूपात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मोठ्या प्रमाणावर बाहेरून होणारे स्थलांतर, वाढती लोकसंख्या आणि त्यातून तयार होणारे राजकीय मतदारसंघ हे महाराष्ट्रासाठी धोक्याचे संकेत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. “मुंबईचा महापौर आम्ही करू” अशा घोषणा केवळ नोकरीसाठी येणाऱ्यांच्या नसून सत्ताकब्जाच्या मानसिकतेचे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत सांगितले की, आजचे राज्यकर्ते राज्यासाठी नव्हे तर ठेकेदारांसाठी काम करत आहेत. सत्तेवर असण्याचे प्रेम इतके आंधळे झाले आहे की राज्य संपले तरी चालेल, पण ठेकेदारांचे हित जपले जात आहे. महाराष्ट्राला ‘क्लीन चिट’ देण्याची फॅक्टरी बनवण्यात आली असून गंभीर प्रकरणांमध्येही चौकशीऐवजी मोकळीक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपकडून करण्यात येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राज ठाकरे यांनी थेट प्रतिआक्रमण केले. पन्नास खोके, पन्नास खोके या घोषणेमागील वास्तव उघड करत त्यांनी विचारले की, इतक्या मोठ्या रकमा नेमक्या कुठून आल्या? बँक कर्जातून आल्या का? की भ्रष्टाचारातून? भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार कोणाचा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंबईच्या ढासळलेल्या अवस्थेवर बोलताना महेश मांजरेकर यांनी एक सामान्य मुंबईकर म्हणून आपली अस्वस्थता व्यक्त केली. वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी, पाण्याची टंचाई आणि अनियंत्रित विकास यामुळे मुंबई राहण्यायोग्य राहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी नियोजनशून्य विकासालाच यासाठी जबाबदार धरले. सध्याचा विकास म्हणजे प्रगती नसून विनाशाची गती असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

मुंबईची भरपाई इतर भागात झाडे लावून होऊ शकत नाही

राज ठाकरे यांनीही यावर भाष्य करत सांगितले की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात सुरू असलेले प्रचंड रिडेव्हलपमेंट प्रकल्प शहरांचा श्वास गुदमरवत आहेत. झाडतोड, मॅनग्रोव्हज नष्ट करणे आणि योग्य टाऊन प्लॅनिंगचा अभाव यामुळे शहरांचे भवितव्य धोक्यात आले आहे. मुंबईची भरपाई चंद्रपूर किंवा इतर भागात झाडे लावून होऊ शकत नाही, असा ठाम मुद्दा उद्धव ठाकरे यांनी मांडला. ‘आरे’ जंगल, गारगाई-पिंजाळ धरणे आणि पाण्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील निर्णयांची माहिती दिली. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी समुद्राच्या पाण्यावर आधारित पर्यायी प्रकल्पाला त्यांनी मंजुरी दिली होती, मात्र सध्याच्या सरकारने तो बाजूला सारून पुन्हा ठेकेदारधार्जिण्या प्रकल्पांना प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला.

ड्रग्ज आणि राजकारणातील पैशांचा संबंध तपासला पाहिजे

ड्रग्ज, गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ठाकरे बंधूंनी केंद्र व राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. ड्रग्ज सहज उपलब्ध होणे, शाळांपर्यंत पोहोचणे आणि त्यावर कारवाई न होणे हे सत्तेच्या संरक्षणाखाली सुरू असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ड्रग्ज आणि राजकारणातील पैशांचा संबंध तपासला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. महापालिका निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करत राज ठाकरे म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या सत्ताधाऱ्यांवर बंधन आणायचे असेल, तर महानगरपालिका हा शेवटचा किल्ला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह सर्व महापालिकांमध्ये जनतेने आपला रोष मतदानातून व्यक्त केला नाही, तर पुढे तक्रार करण्याचा अधिकारही उरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मराठी समाजाला निर्णायक भूमिकेचे आवाहन

बिनविरोध निवडणुका, उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडणे आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही उद्धव ठाकरे यांनी तीव्र टीका केली. ही लोकशाहीची हत्या असून जनतेचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये ‘जेन-झी’ पिढीमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत असून भविष्यात त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुलाखतीच्या शेवटी ठाकरे बंधूंनी स्पष्ट संदेश दिला की, ही सत्ता मिळवण्यासाठीची युती नसून महाराष्ट्र वाचवण्यासाठीची लढाई आहे. मराठी माणसाने आता निर्णय घ्यायचा आहे, एकत्र उभे राहायचे की इतिहासाच्या गर्तेत हरवून जायचे. आज नाही तर कधीच नाही, असा इशारा देत त्यांनी मराठी समाजाला निर्णायक भूमिकेचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *