Maharashtra Vidhan Parishad Election | विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी; 12 मे रोजी होणार 9 जागांसाठी मतदान
Maharashtra Vidhan Parishad Election | महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 अशी असेल. विशेष म्हणजे, मतदानानंतर त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.
13 मे रोजी 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार
विधान परिषदेतील 9 विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त मतं असल्यामुळे महायुतीने अतिरिक्त उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत.
या 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार
उद्धव ठाकरे (शिवसेना – ठाकरे गट)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)
महायुतीचे 8 उमेदवार सहज विजयी होण्याची शक्यता
विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. महायुतीकडे भाजप (131), शिवसेना शिंदे गट (57) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (40) असे एकूण मजबूत संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ सुमारे 49 आहे. त्यामुळे त्यांचा एकच उमेदवार निश्चित विजयी होऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार असून, सध्याच्या परिस्थितीत ते कठीण मानले जात आहे.
विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ
भाजप – 131
शिवसेना (शिंदे गट) – 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 40
काँग्रेस – 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 10
शिवसेना (ठाकरे गट) – 20
समाजवादी पार्टी – 2
जनसुराज्य शक्ती – 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी – 1
राष्ट्रीय समाज पक्ष – 1
एमआयएम – 1
सीपीआय (एम) – 1
पीडब्ल्यूपी – 1
राजर्षी शाहू विकास आघाडी – 1
अपक्ष – 2
एकूण आमदार: 286
राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) असलेल्या अतिरिक्त मतांमुळे आणि महायुतीने ९ वा उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे १२ मे रोजी होणारी ही निवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे.
News Title: Maharashtra Vidhan Parishad Election 2026 Voting for 9 seats on May 12
