![]()
राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर लक्ष ठेवत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकींना ते उपस्थित राहणार असून, विशेषतः नर्मदा प्रकल्पासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत ते सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजता नर्मदा प्रकल्पाबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहतील. याशिवाय दिल्ली दौऱ्यात काही राजकीय भेटीगाठी होतात का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले असून, नागरिकांना एसएमएसद्वारे सतर्कतेचे संदेश पाठवण्यात येत आहेत. हे संदेश गांभीर्याने घेऊन अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू दरम्यान, मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने बंद करण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दरड हटविल्यानंतर वाहनांची ये-जा पूर्ववत झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे दिली. मुख्यमंत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. वाहनांची ये-जा पूर्ववत झाली असून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सुरक्षित प्रवास करावा.” आळंदी व देहू येथे येणाऱ्या वारकऱ्यांनी पुण्यातच वारीमध्ये सहभागी व्हावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे. देहू व आळंदी येथे न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे. काही वारकरी बांधव पुणे शहरापर्यंत आले असल्यास त्यांनी पुणे शहरातच थांबावे, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर:नर्मदा प्रकल्पावरील महत्त्वाच्या बैठकीला उपस्थिती, मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू
