Bahiram Yatra Clinic Shut Pilgrims Inconvenience Overcharging | बहिरम यात्रेतील दवाखाना शनिवारी बंद: भाविकांना उपचारांविना गैरसोयीचा सामना करावा लागला – Amravati News



जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे बांधण्यात आलेल्या दवाखान्याचे टाळे असे दिवसभर लागलेलेच होते.

चांदूर बाजार तालुक्यातील प्रसिद्ध बहिरम यात्रेतील दवाखाना शनिवारी (२७) बंद होता. यामुळे यात्रेकरूंना वैद्यकीय उपचारांविना गैरसोयीचा सामना करावा लागला. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या या यात्रेत अवघ्या काही दिवसांतच गैरव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

.

राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक बहिरम यात्रेसाठी येतात. मात्र यावर्षी पार्किंगसाठी जास्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्य सेवाही अनियमित असल्याने मूलभूत सुविधांबाबत भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतानाही पंचायत समिती अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

यात्रा अधीक्षक रामेश्वर रामागडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी समाधानकारक माहिती दिली. मात्र, त्यांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचे दिसून आले. यामुळे यावर्षीच्या यात्रा व्यवस्थापनाकडे पंचायत समिती अधिकाऱ्यांचे पुरेसे लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात्रेच्या पहिल्याच शनिवारी (२७) दवाखाना बंद असल्याने अनेक यात्रेकरूंचा हिरमोड झाला. दरवर्षी यात्रेत छोटी-मोठी पडझड, अचानक आजारी पडणे, चक्कर येणे, भाजणे किंवा जखम होणे अशा घटना घडतात. त्या दिवशीही अशाच काही घटना घडल्या, परंतु गरजूंना उपचार मिळू शकले नाहीत. शनिवार हा सुटीचा दिवस असल्याने दवाखाना बंद असावा, असे काहींचे म्हणणे असले तरी, नेमक्या सुटीच्या दिवशीच भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. अशावेळी दवाखाना बंद असणे ही चिंतेची बाब असल्याचे भाविकांनी म्हटले आहे.

यात्रा व्यवस्थापनाने पार्किंग दरांवर नियंत्रण ठेवावे आणि आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. दूरवरून प्रवास करून येणाऱ्या भाविकांना अनेकदा वातावरणातील बदलामुळे किंवा बाहेरचे अन्न खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या येतात. अशा परिस्थितीत, यात्रा व्यवस्थापनाने दरवर्षीप्रमाणे आरोग्यविषयक सुविधा अखंडित ठेवणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *